Headlines

गांधी, शास्त्री जयंती उत्साहात:छत्रपती संभाजीनगरातली जपानी शिष्टमंडळाची खास भेट विशेष चर्चेत; अहिंसा-शांती संदेशावर मंथन!




राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७व्या जयंतीनिमित्त आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, छत्रपती संभाजीनगर येथे विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करून अत्यंत उत्साहात अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा व निष्ठावान देशसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला. आजच्या तरुण पिढीने या महान नेत्यांच्या विचारांचे व आदर्शांचे अनुकरण करणे काळाची गरज आहे. जपानी शिष्टमंडळाची भेट ठरली विशेष आकर्षण गांधी जयंतीचे औचित्य साधून जपानी शिष्टमंडळाने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळातील सदस्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा, त्यांच्या विचारांचा आणि गांधी स्मारक निधीतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी भारत-जपान मैत्री, गांधीवादी विचारसरणी आणि जगभरात शांततेचा संदेश पसरवणे या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. मान्यवरांची उपस्थिती महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा हा सोहळा डॉ. डी. एस. कोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रंजन दाणी उपस्थित होते, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाई चंद्रकांत चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास जपानी शिष्टमंडळातील कोटा मागोची, कोटा नोगुची, माई आरीमोतो आणि नाओको इटो यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय प्रा. डॉ. मछिंद्र गोर्डे, सुभाष ग्राफ, डॉ. हरदास, प्रा. डॉ. उमाकांत राठोड, प्रा. माजिद शेख, बनकर, इंगळे सर, प्रा. डॉ. प्रकाश करमाड आणि सुहास सिरसीकर यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी महात्मा गांधींच्या विचारांना उजाळा देत शांतता, अहिंसा आणि मानवकल्याणाचा संदेश दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *