![]()
जगाची नवीन अर्थव्यवस्था ही ज्ञानावर आधारित असून ज्ञान हाच तिचा कच्चा माल आहे. संशोधन, पेटंट आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या बौद्धिक संपत्तीवर आधारित रॉयल्टी ही भविष्यातील अर्थव्यवस्थेची महत्त्वाची ताकद ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी संधी, अत्याधुनिक ज्ञान आणि नवउत्पादनासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपली बुद्धिमान मुले परदेशात जाऊन संशोधन करतात आणि त्यातून मिळणारी बौद्धिक संपत्ती परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून बाजारात येते. ही परिस्थिती बदलण्यासाठी देशातच नवोन्मेषाच्या संधी निर्माण कराव्या लागतील, असे मत एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक आणि महात्मा गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. विवेक सावंत यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने कोथरूड येथील गांधी भवन येथे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह २०२६’ अंतर्गत ‘तरुणांसमोरील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त अन्वर राजन, कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, एम. एस. जाधव, प्रवीण सप्तर्षी, रमेश आढाव यांच्यासह आप्पा अनारसे, तेजस भालेराव, सूरज कुलकर्णी, सचिन चौहान, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. डॉ. सावंत म्हणाले, ‘‘नवीन अर्थव्यवस्थेचा आधार ज्ञान असून एकदा ज्ञानावर गुंतवणूक केली की त्यातून दीर्घकाळ रॉयल्टी निर्माण होऊ शकते. मोबाईल तंत्रज्ञानामध्ये हजारो पेटंटचा वापर होतो. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये तुलनेने कमी पार्ट असले तरी त्यामागील विविध तंत्रज्ञान आणि पेटंटसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी दिली नाही, तर देशाला अशा प्रकारची बौद्धिक संपत्ती निर्माण करता येणार नाही.’’ एमकेसीएलच्या माध्यमातून राज्यात सुमारे ६ हजार ३०० केंद्रे कार्यरत असून दरवर्षी सुमारे नऊ लाख विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संगणक शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘आज वेग, अतिवेग आणि जीवघेणा वेग अशा तीन पातळ्यांवर समाज बदलत आहे. या वेगाशी जुळवून घेताना युवकांची दमछाक होत आहे. पूर्वी स्थैर्य आणि निश्चितता होती; मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे सातत्याने परिवर्तन होत आहे. आव्हान म्हणजे अशक्यता नाही,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक दरी अद्याप मोठी असून ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान आहे. मूठभर यशस्वी व्यक्तींच्या उदाहरणांवरून यशाचे मापदंड ठरवल्याने युवकांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण होत आहे. एकसारख्या परीक्षा आणि ठरावीक उत्तरपद्धतीमुळे नवीन विचारांना पुरेशी चालना मिळत नाही. विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता आणि कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे; मात्र पारंपरिक शिक्षणपद्धतीत त्यावर पुरेसा भर नसल्याचे त्यांनी नमूद केले.
Source link
ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी संशोधनाला प्रोत्साहन आवश्यक:विद्यार्थ्यांना संधी दिल्यासच जागतिक बाजारपेठेत स्पर्धा शक्य: डॉ. विवेक सावंत