![]()
विष्णुपुरी परिसरातील बंद खोलीत तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या खूनप्रकरणाचा नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. बंदूक परत न केल्याच्या वादातून तरुणाचा दगडाने डोक्यात व तोंडावर गंभीर वार करून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. मयत सनी अजेबिसंग मसीह (वय ३६, रा. ईसानगर, बटाला, जि. गुरुदासपूर, पंजाब; सध्या रा. विष्णुपुरी) आणि आरोपी दारासिंग गुरुनामसिंग (वय ५१, रा. नांदेड) हे विष्णुपुरी परिसरातील एका खोलीत भाड्याने राहत होते. सनीने आरोपीकडून घेतलेली बंदूक परत न केल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता या वादातून आरोपीने सनीच्या डोक्यावर आणि तोंडावर दगडाने गंभीर वार केले. त्यात सनीचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह खोलीत लपवून ठेवला आणि बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, दि. २ ऑक्टोबर रोजी बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचांसमक्ष खोलीचे कुलूप तोडून पाहणी केली असता सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी फिर्यादी सुरज शास्त्री यांच्या जबाबावरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गु.र.नं. १२८३/२०२६, कलम १०३(१), ३५१(२), ३५१(३) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपासातून आरोपीचा माग काढला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार केली. आरोपी मूळचा पंजाबमधील असल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक होते. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी पंजाबला पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी अवघ्या काही तासांत दारासिंग गुरुनामसिंग याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि कपील पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने तसेच अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, इतवारा विभागाच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, सुनील भिसे, बाबुराव चव्हाण आणि गुन्हे शोध पथकातील माधव मारवाडे, लक्ष्मण जाधव, माळगे, शेख, कांबळे, विठ्ठल भिसे, कल्याणकर, पवार, शेख गफार, जीवन तेलंग, भगवान, टिपरसे, संतोष जाधव, बूंगई, कवडे तसेच सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांनी केली.
Source link
बंद खोलीतील खुनाचा काही तासांत उलगडा:विष्णुपुरीतील तरुणाचा दगडाने ठेचून खून, पंजाबमधील आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात