Headlines

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना इशारा:‘अजितदादांचं नाव वापरायचं आणि कुटुंबाला बदनाम करायचं, हे चालणार नाही’




बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री सोमेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभे केलेले पुरुषोत्तम जगताप यांच्यावर थेट निशाणा साधला. अजित पवारांचे नाव आणि फोटो वापरून निवडणूक लढवू नये, तर स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी, असा स्पष्ट इशारा सुनेत्रा पवार यांनी दिला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार पॅनलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपच्या पाठिंब्याने पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक राजकीयदृष्ट्याही चर्चेचा विषय ठरली आहे. ‘दादांच्या जाण्याने शेती आणि परिसर सुना झाला’ प्रचाराच्या शुभारंभावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या कारखान्याशी असलेल्या दीर्घ संबंधांचा उल्लेख केला. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याचे सांगत त्यांनी प्रचाराच्या शुभारंभाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल उपस्थितांचे आभार मानले. ‘दादांच्या जाण्याने इथला बांध, न बांध, शेती आणि परिसर सुना झाला आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीत दादांचा श्वास होता,’ असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजित पवार स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या गरजा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होत्या, असेही त्यांनी सांगितले. 1992 मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अजित पवार यांनी सोमेश्वर कारखान्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर तब्बल 34 वर्षे त्यांनी कारखान्यासाठी काम केले आणि संस्था उभी करण्यासाठी प्रयत्न केले, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा’ पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या नावाच्या वापरावरून स्पष्ट भूमिका मांडली. ‘माझा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे आदरणीय दादांचे नाव वापरण्याची गरज नाही,’ असे त्या म्हणाल्या. अजित पवार यांच्या कुटुंबाच्या भूमिकेविरोधात जाऊन कोणाला निवडणूक लढवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी, असे आवाहन त्यांनी केले. अजित पवारांचे नाव वापरायचे आणि त्यांच्याच कुटुंबाला बदनाम करायचे, हे योग्य नाही आणि ते चालणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. ‘चेअरमन नाव गाजवणारा नाही, तर महाराष्ट्रात भाव गाजवणारा असेल’ सोमेश्वर कारखान्याच्या पुढील नेतृत्वाबाबतही सुनेत्रा पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांनी ज्या विश्वासाने कारखाना जपला, त्याच विश्वासाने त्यांच्या पश्चात आपणही कारखान्याची जबाबदारी सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या संचालक मंडळातील 21 जणांना विश्वासात घेऊनच चेअरमनची निवड केली जाईल, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. ‘सोमेश्वरचा होणारा चेअरमन हा नाव गाजवणारा नसेल, तर महाराष्ट्रात भाव गाजवणारा असेल,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘शेतकरी आणि कारखान्याच्या अडचणींसाठी खंबीरपणे उभी राहीन’ अजित पवार यांनी घेतलेली जबाबदारी आपण पुढे नेणार असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. शेतकरी आणि कारखान्याशी संबंधित कोणतीही अडचण निर्माण झाली, तरी आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी दाखवलेल्या दिशेनेच सोमेश्वर कारखान्याने पुढे जावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. कारखाना हा कोणत्याही एका व्यक्तीची वैयक्तिक मालमत्ता नसून सभासदांच्या विश्वासातून उभी राहिलेली संस्था आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कारखान्याच्या आजवरच्या यशाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला देता येणार नाही. हजारो सभासद आणि शेतकऱ्यांच्या योगदानातून ही संस्था उभी राहिली आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुरुषोत्तम जगताप यांच्या स्वतंत्र पॅनलविरोधातील अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट झाली आहे. आगामी निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. हेही वाचा… ऊस गळीत हंगामापूर्वी शंभूराज देसाईंची मोठी मागणी:साखर कारखान्यांना टनामागे 750 रुपयांचे अनुदान द्या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेती क्षेत्रासह साखर उद्योगासमोरही अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पावसाअभावी अनेक भागांतील ऊस पिकावर परिणाम झाला असून, उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत आगामी ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना प्रतिटन 750 रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *