![]()
उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद अधिकच चिघळला असून, भाजपने पत्रकार परिषद घेत उल्हासनगरमध्ये युतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. यापुढील कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करता स्वतंत्रपणे काम करण्याची भूमिका भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. उल्हासनगरमधील स्थानिक राजकारणात भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महायुतीचा भाग असले तरी स्थानिक पातळीवरील मतभेद सातत्याने वाढताना दिसत आहेत. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून सुरू झालेल्या वादाने आता थेट युतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाजपने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेनेसोबत यापुढे स्थानिक पातळीवर युती न करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, भाजपच्या या भूमिकेला शिवसेनेकडूनही तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले. उल्हासनगरमध्ये शिवसेना युतीमध्येच असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आले. त्यामुळे भाजपने युतीतून बाहेर पडल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेची भूमिका काय, यावरून स्थानिक राजकारणात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या पत्रकार परिषदेतून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी पप्पू कलानी यांच्या राजकीय प्रभावाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोप केला. पप्पू कलानी गँगस्टार असतील तर रवींद्र चव्हाण हे मंचेकर गँगचे ऑपरेटर असल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपामुळे उल्हासनगरमधील राजकीय संघर्षाला आणखी धार आली आहे. रवींद्र चव्हाण यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, अशी मागणीही कमलेश निकम यांनी केली. रवींद्र चव्हाण हे केवळ कल्याण-डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपला आपली ताकद दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आगामी महापालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये महायुतीतील अंतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे भाजपने शिवसेनेपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेकडून आपण युतीमध्येच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीचे भवितव्य नेमके काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातही महायुतीसमोर बंडाचे आव्हान उल्हासनगरमधील संघर्षाची चर्चा सुरू असतानाच विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही महायुतीमध्ये अंतर्गत बंडाची शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानुसार पुण्याचे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहेत, तर नागपूर मतदारसंघाची जागाही भाजपकडे आहे. मात्र पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मंगेश चिवटे यांच्या भूमिकेमुळे भाजपसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार चिवटे येत्या मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन सानप यांनीही पुणे शिक्षक मतदारसंघावर दावा केला आहे. आपण याच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे एकाच पक्षातील इच्छुक उमेदवारांमुळेही समीकरणे गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागावाटपानुसार पुण्याच्या दोन जागांसह नागपूरची जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. या तीन जागांसाठी भाजपने तब्बल 15 संभाव्य उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत मित्रपक्षांकडूनच उमेदवारीचे दावे पुढे आल्यास जागावाटपाचा अंतिम निर्णय आणि त्यानंतर निर्माण होणारे बंडाचे आव्हान भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष थेट पत्रकार परिषदांपर्यंत पोहोचला आहे, तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये मतभेद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि मित्रपक्षांच्या भूमिकांकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. महायुतीत सत्तेचा वाटा मिळत नसल्याची रामदास आठवलेंची खंत:म्हणाले, ‘शरद पवारांनी 7 विधान परिषद जागा दिल्या, भाजपसोबत 12 वर्षांत एकही नाही’ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाला महायुतीमध्ये अपेक्षित राजकीय वाटा मिळत नसल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या पक्षांच्या तुलनेत कमी असली, तरी महायुतीतील घटक पक्षांनी रिपब्लिकन पक्षाला सत्तेत योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सविस्तर वाचा…
Source link
उल्हासनगरमध्ये महायुतीतील संघर्ष चिघळला:भाजपचा युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय, शिवसेनेचे प्रत्युत्तर