Headlines

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांची केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी चर्चा:डॉ.नड्डांशी चर्चा करुन समस्या सोडवण्याचे आश्वासन‎




आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन (सीआयटीयू)च्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यांसाठी ६ ऑक्टोबरला बालभवन येथून गडकरी यांच्या निवासस्थानावर विदर्भ विभागीय मोर्चा काढून निवेदन देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मोर्चा निघण्यापूर्वीच गडकरी यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावून घेतल्याने आंदोलनाऐवजी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी शिष्टमंडळाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या कामाचे स्वरूप, त्यांच्यावर असलेली जबाबदारी, अत्यल्प मानधनात कराव्या लागणाऱ्या कामाची सविस्तर माहिती गडकरी यांच्यासमोर मांडली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी, गर्भवती महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व उपचार मिळवून देण्यासाठी आशा स्वयंसेविकांची महत्त्वाची भूमिका आहे. कोरोना महामारीच्या काळातही आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी जोखमीची पर्वा न करता आरोग्य यंत्रणेसोबत काम केले. कोरोना काळानंतरही कर्करोग, कुष्ठरोग, क्षयरोग, डेंग्यू, मलेरिया, रक्तदाब, मधुमेह, सिकलसेल, एचआयव्ही यांसह विविध आजारांच्या प्रतिबंध व उपचारासाठी लाभार्थ्यांना आरोग्यसेवेशी जोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र, या कामाच्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यल्प असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि आरोग्याचा खर्च भागविणे कठीण होत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. यावेळी काँ. राजेंद्र साठे, कॉ. अर्चना घुगरे, कॉ. प्रीती मेश्राम, सरला निकोसे (गटप्रवर्तक), उषा मूर्खे, सुनंदा बसेशंकर, उषा मेश्राम, भय्याजी देशकर, सुनील घीमे, अर्चना कोरडे, जयश्री ढोगे, रवीना मुनेश्वर उपस्थित होते, अशी माहिती आशास्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या वतीने पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे. मार्च २०२५ मध्ये लोकसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. जे. पी. नड्डा यांनी आशा स्वयंसेविकांच्या मानधनात १,५०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. ही मानधनवाढ मार्च २०२५ पासून लागू करावी, गटप्रवर्तकांनाही दरमहा दोन हजार रुपयांची वाढ द्यावी तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *