![]()
आपल्या सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि विलोभनीय कडी असलेला ‘शनी’ ग्रह रविवारी ४ ऑक्टोबर रोजी पृथ्वीच्या अतिशय जवळ असणार आहे. या दिवशी शनी ग्रह अगदी सूर्यासमोर (प्रतियुती स्थितीत) राहणार आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने ही एक विशेष घटना मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने तसेच हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी ही खगोलीय घटना अनुभवण्यासाठी विशेष तयारी केली आहे. शनी ग्रहाचा व्यास सुमारे १,२०,००० कि.मी. आहे. तापमान उणे १८० अंश सेल्सिअस असते. या ग्रहाची घनता सर्वात कमी आहे. शनी ग्रहाचे कडे (रिंग) १ लाख ३० हजार कि.मी. पर्यंत पसरलेले आहेत. ते बर्फाचे बनलेले आहेत. शनिचे एकूण ८३ चंद्र आहेत. ‘टायटन’ हा त्याचा सर्वात मोठा चंद्र आहे. त्यांच्या मते ४ ऑक्टोबर रोजी सूर्य मावळल्यानंतर लगेचच पूर्व क्षितिजावर शनीचा उदय होईल. पहाटे पश्चिम क्षितिजावर तो मावळेल. हा ग्रह रात्रभर आकाशात काळसर व पिवळसर रंगात अतिशय चमकदार दिसेल. शनीचे हे सौंदर्य साध्या डोळ्यांनी सहज दिसू शकेल. त्याचे कडे पाहण्यासाठी टेलिस्कोपची (दुर्बीण) आवश्यकता असेल. साध्या डोळ्यांनी हे कडे दिसणार नाहीत. अमरावती येथील खगोलप्रेमींना शनीची ही विलोभनीय रिंग पाहता यावी यासाठी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत मोफत सोय करण्यात आली आहे. गिरुळकर यांच्याकडे असलेल्या ८ इंच व्यासाच्या दुर्बिणीतून शनिचे कडे पाहता येतील. त्यासाठी संबंधितांना ‘गुरुकृपा’ कॉलनी, वडाळी तलावाजवळ, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे पोहोचावे लागेल. शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असला तरी, या घटनेचा मानवी जीवनावर कोणताही वाईट किंवा नकारात्मक परिणाम होणार नाही. माहिती हवी असल्यास अभ्यासक विजय गिरुळकर यांच्याशी ९६३७३८४८१२ संपर्क साधावा. प्रतियुती म्हणजे काय? जेव्हा सूर्य, पृथ्वी, शनि ग्रह एकाच सरळ रेषेत येतात, तेव्हा त्या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ असे म्हणतात. या काळात पृथ्वी, शनि ग्रहांमधील अंतर सरासरीपेक्षा बरेच कमी असते. हाच प्रसंग उद्या, रविवारी अनुभवायला मिळणार आहे.
Source link
पृथ्वीच्या अगदी येणार जवळ:दुर्बिणीतून शनीची कडी पाहण्याची संधी, आकाशात आज पुन्हा एक खगोलीय घटना घडणार