Headlines

गुरुकुंज मोझरीत आंदोलन:मोबाईल टॉवरमध्ये 205 फुटांपर्यंत वर चढला अन्यायग्रस्त शेतकरी, अचलपूर एसडीओ कार्यालयातील जमीन फेरफार‎




अचलपूर एसडीओ कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शेतीच्या एका प्रकरणात अनेक वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाने त्रस्त झालेले वऱ्हा येथील शेतकरी प्रदीप शामराव डाखोरे यांनी शुक्रवार, २ रोजी राष्ट्रसंताच्या कर्मभूमीतील बसस्थानकासमोरील एका मोबाईलच्या उंच टॉवरवर २५० फुटांपर्यंत चढून लक्षवेधी आंदोलन केले. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. सोबतच टॉवरखाली त्यांची आई शोभा डाखोरे, पत्नी सुषमा, भाऊ संदीप, तसेच ज्ञानेश व ओम या दोन मुलांनी उपोषण सुरू केले आहे. जिल्ह्यातील मौजा सर्फाबाद, हिरुळ पूर्णा आणि नारायणपूर येथील भोगवटा वर्ग-२ मधील सुमारे १६ एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून हे प्रकरण अचलपूर एसडीओ कार्यालयात सुरू आहे. या प्रकरणी अनेकदा झालेल्या सुनावणी व आदेशांत न्याय न मिळता, उलट माझ्यावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. सदर जमीन प्रकरणात कथित बनावट कागदपत्रे व सेल सर्टिफिकेटच्या आधारे जमिनीचे हस्तांतरण करण्यात आल्याचा दावा डाखोरे यांनी केला आहे. तसेच भोगवटा वर्ग-२ मधील जमीन आवश्यक परवानग्यांशिवाय वर्ग-१ मध्ये रूपांतरित केल्याचे दाखवून खरेदी-विक्री करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणात तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. सकाळी ७ वाजतापासून सुरू असलेल्या या गांधीगिरी आंदोलनाचे १२ तास उलटले होते. वृत्त लिहेस्तोवर प्रशासनाकडून तोडगा निघाला नव्हता. आंदोलन सुरूच होते. आंदोलनस्थळी सकाळपासून मोठी गर्दी झाली होती. दरम्यान माजी जि. प. सदस्य संजय देशमुख, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, अविनाश ठाकरे, आकाश डेहनकर, रवी मानव आदींनी भेटी दिल्या आहेत. पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर फायदा नाही या आंदोलनासंदर्भात प्रदीप डाखोरे यांनी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले होते. २ ऑक्टोबरपूर्वी प्रशासनाने निवेदनाची दखल घ्यावी. बैठक आयोजित करावी. प्रश्न मार्गी लावावा, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करत त्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. ते पहाटेच टॉवरवर चढले. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *