महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांशी संबंधित विविध प्रश्नांवरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी श
.
पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. परीक्षांमधील कथित गोंधळ, पेपरफुटीचे प्रकार, रखडलेल्या भरती प्रक्रिया तसेच MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विविध मुद्दे विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. आंदोलनाला तीन दिवस झाले असून, अद्याप सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी कायम आहे.
हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. दरम्यान, आंदोलनातील काही विद्यार्थी प्रतिनिधींनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या आणि आंदोलनाची सद्यस्थिती पवार यांच्यासमोर मांडली. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पवार यांनी या प्रश्नावर सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये थेट संवाद होण्याची गरज व्यक्त केली.
‘सुसंवादातूनच प्रश्न सुटतील’
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना शरद पवार यांनी सरकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. एका बाजूला मुख्यमंत्री किंवा सरकारचे प्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली, तर या प्रश्नावर मार्ग काढता येऊ शकतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.
केवळ आंदोलन सुरू राहिल्याने प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये सुसंवाद आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचेही पवार यांनी सांगितले.
फडणवीसांना फोन करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांची माहिती
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा निघावा यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या मुंबईत नसून नागपूरमध्ये असल्याचेही पवार यांनी सांगितले. ते उद्या सकाळी मुंबईत परतण्याची शक्यता असून, त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंती केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेचे आवाहन
मुख्यमंत्री मुंबईत आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, तसेच आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांच्या काही प्रतिनिधींसोबत थेट बैठक घ्यावी, असेही शरद पवार यांनी सुचवले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला जे काही शक्य आहे ते करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत परतल्यानंतर या आंदोलनाबाबत काय भूमिका घेतात आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतात का, याकडे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय होणार का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा….
गर्जना मोर्चात विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल:‘भाजप मतचोरीत सहभागी’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप, जितेंद्र आव्हाडांनीही सरकारला घेरले

ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काढण्यात आलेल्या गर्जना मोर्चात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मतदारयाद्यांमधील कथित घोळ, ईव्हीएममधील अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. या मोर्चात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका मांडली. भाजप या कथित मतचोरीत सहभागी असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला, तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाही धोक्यात आल्याची टीका केली. सविस्तर वाचा….