![]()
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) भेसळ आणि निकृष्ट खाद्यपदार्थांविरोधातील कारवाईला वेग दिला आहे. अकोल्यात FDAच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 1900 किलो मिठाईचा साठा जप्त केला आहे. अहमदाबादहून दोन ट्रकमधून अकोल्यात आणण्यात आलेला हा साठा अस्वच्छ आणि आरोग्यास घातक परिस्थितीत वाहतूक केला जात असल्याचे तपासणीत आढळून आले. जप्त केलेल्या मिठाईची किंमत सुमारे 5 लाख 72 हजार रुपये आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अकोल्यातील रायलीजिन परिसरातील Arco Transport येथे सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास FDAच्या पथकाने तपासणी केली. यावेळी गुजरातमधील अहमदाबाद येथून दोन ट्रकमधून आणलेला विविध प्रकारच्या मिठाईचा मोठा साठा आढळून आला. या साठ्यामध्ये अंबिका स्वीट हलवा, GWAL ट्रॅडिशनल स्वीट, श्री ग्वाल हलवा, अंबिका रिच स्वीट, ब्रजनिधी स्वीट आणि मुरलीधर स्वीट यांसह विविध ब्रँडच्या मिठाईचा समावेश होता. सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाईची विक्री होत असल्याने या मालाची तपासणी करण्यात आली. अस्वच्छ परिस्थितीत मिठाईची वाहतूक तपासणीदरम्यान मिठाईची वाहतूक करताना आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. खाद्यपदार्थांची अशा प्रकारे वाहतूक केल्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. FDAच्या पथकाने मिठाईचे आवश्यक नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यानंतर उर्वरित 1900 किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला माल अकोला महापालिकेच्या भोड येथील बायोगॅस प्रकल्पातील SWM Processing Plant येथे नेऊन नष्ट करण्यात येणार आहे. तीन व्यापाऱ्यांवर कारवाई या प्रकरणात मिठाईचा साठा मागवणाऱ्या व्यापाऱ्यांवरही FDAने कारवाई केली आहे. कमल शर्मा, वैभव पाटील आणि अशोक अहुजा यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांची साठवणूक आणि वाहतूक करताना स्वच्छता तसेच अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मिठाई, खवा, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अशा पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन FDAकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. गणेशोत्सवानंतर दिवाळीतही कारवाईचा वेग यापूर्वी गणेशोत्सवाच्या काळातही अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील विविध भागांत कारवाया केल्या होत्या. भेसळयुक्त खवा, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांची तपासणी करून अनेक ठिकाणी साठे जप्त करण्यात आले होते. आता दिवाळीपूर्वी पुन्हा एकदा FDAने कारवाईचा वेग वाढवला आहे. FDAच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर विभागाच्या कारवाईकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी तपासण्या आणि धाडी घेण्यात आल्या आहेत. मोठ्या आस्थापनांसह हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांचीही तपासणी करण्यात आली आहे. अकोल्यातील कारवाईमुळे दिवाळीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिठाई किंवा इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनीही स्वच्छता, पॅकिंग, उत्पादनाची माहिती आणि विक्रेत्याची विश्वासार्हता तपासावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हेही वाचा…. 16 ऑक्टोबरपासून राज्यभर पाणीकपात:पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; स्थानिक स्वराज्य संस्थांना किमान 10% कपातीचे निर्देश, उद्योगांना 30% पाणी पुनर्वापर बंधनकारक अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यातील पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागांत पाण्याची उपलब्धता मर्यादित झाली आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने आतापासूनच पाण्याच्या वापरावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 16 ऑक्टोबर 2026 पासून राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. सविस्तर वाचा…
Source link
तुकाराम मुंढेंच्या FDA चा दिवाळीपूर्वी धडाका:अकोल्यात 1900 किलो मिठाई जप्त, 3 व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित