Headlines

दुष्काळाच्या सावटात मुंबईत रस्ते धुण्यासाठी 8 कोटींचे कंत्राट:पाणीकपात असताना लाखो लिटर पाण्याच्या वापरावर प्रश्नचिन्ह




राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये जलसंकटाची चिंता वाढली असून, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेने शहरातील रस्ते पाण्याने धुण्यासाठी तब्बल 8 कोटी 25 लाख 33 हजार 48 रुपयांचे कंत्राट प्रस्तावित केले आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यातील घटलेले पर्जन्यमान आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर सरकारने पाणी नियोजनावर भर दिला आहे. जलसंपदा विभागाने उपलब्ध जलसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. धरणे आणि जलाशयांमधील पाण्याला प्राधान्याने पिण्यासाठी वापरण्याचे तसेच भविष्यातील गरज लक्षात घेऊन काही पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, याच काळात मुंबईत सार्वजनिक रस्ते धुण्यासाठी टँकरद्वारे पाणी वापरण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. मुंबईत पाणीकपात लागू असताना रस्ते धुण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाणार असल्याने या निर्णयाच्या गरजेवर चर्चा सुरू झाली आहे. 377 रस्ते, तब्बल 657 किलोमीटरचे अंतर मुंबईतील धूळ आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने रस्ते धुण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील 26 विभागांमधील सुमारे 657 किलोमीटर लांबीचे 377 सार्वजनिक रस्ते या कामासाठी निश्चित करण्यात आले आहेत. या रस्त्यांची पावसाळा वगळता सुमारे 150 दिवस जेटिंग पद्धतीने स्वच्छता करण्याचे नियोजन आहे. यासाठी 2 हजार, 5 हजार आणि 10 हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर भाडेतत्त्वावर घेतले जाणार आहेत. टँकरला जेटिंगची सुविधा जोडून उच्च दाबाने रस्त्यांवर पाणी फवारले जाणार आहे. सात परिमंडळांसाठी 8 कोटींपेक्षा जास्त खर्च मुंबई महापालिकेच्या सातही परिमंडळांमध्ये ही सेवा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ई-निविदा प्रक्रियेद्वारे टँकर सेवा घेण्यात येणार असून, संपूर्ण कामासाठी 8 कोटी 25 लाख 33 हजार 48 रुपये खर्च प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी महापालिका पाण्याचा वापर करणार असली, तरी सध्या शहरातच पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे या खर्चासोबतच पाण्याच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईत 10 टक्के पाणीकपात; मग रस्ते धुण्यासाठी पाणी कुठून? मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील उपलब्ध साठ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 10 टक्के पाणीकपात लागू आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून केले जाते. अशा परिस्थितीत रस्ते धुण्यासाठी टँकरमधून पाण्याचा वापर करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्यांची स्वच्छता आणि धूळ नियंत्रण गरजेचे असले, तरी त्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याऐवजी आधुनिक यांत्रिक सफाई यंत्रणा, रोड स्वीपिंग मशीन किंवा इतर पर्यायी पद्धतींचा वापर वाढवता येईल का, यावरही चर्चा होण्याची गरज आहे. पाण्यासोबत मोठ्या आर्थिक खर्चावरही आक्षेप या योजनेत केवळ पाण्याचा वापरच नव्हे, तर महापालिकेच्या तिजोरीवर होणाऱ्या खर्चावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सात परिमंडळांतील रस्ते धुण्यासाठी तब्बल 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च होणार आहे. दरम्यान, या कंत्राटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याने नागरिक आणि काही स्तरांवरून या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, महापालिकेच्या म्हणण्यानुसार रस्त्यांवरील धूळ आणि प्रदूषण नियंत्रणासाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे. धूळ आणि प्रदूषण नियंत्रणाचे आव्हान मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाहनांची संख्या मोठी असल्याने रस्त्यांवर धूळ साचते. बांधकामे, वाहतूक आणि इतर कारणांमुळे हवेतील धूलिकण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्याची गरज महापालिकेकडून व्यक्त केली जाते. मात्र, ही स्वच्छता करताना पाण्याचा वापर किती असावा आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून कोणती पर्यायी व्यवस्था करता येईल, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. विशेषतः राज्यात पाणीटंचाईची शक्यता व्यक्त होत असताना मुंबईतील या प्रस्तावामुळे पाणी व्यवस्थापनावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन, तर दुसरीकडे रस्ते धुण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करण्याचे नियोजन, यामुळे महापालिकेच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित होत आहेत. हेही वाचा… गोरेगाव फिल्म सिटीतील शूटिंग सेटला आग:’एमटीव्ही हसल’च्या महाअंतिम सोहळ्यावेळी उडाली खळबळ, PCR युनिटमध्ये दुर्घटना सोमवारी मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटीमधील एका तात्पुरत्या शूटिंग सेटवर आग लागली. ही घटना प्राईम फोकस स्टुडिओच्या मागे असलेल्या तात्पुरत्या सेटवर घडली. दुपारी 4:02 च्या सुमारास आगीची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सायंकाळी 4:55 पर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *