![]()
पुणे महानगरपालिकेच्या २७ शाळांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (एम.सी.ई. सोसायटी), आझम कॅम्पस आणि डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल साक्षरता उपक्रमाची राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची माहिती घेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना संगणक साक्षरता, पायथन प्रोग्रामिंग, हार्डवेअर रिपेअरिंग, स्क्रॅच कोडिंग, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि स्पोकन इंग्लिशचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तांत्रिक कौशल्यांचे राज्यपालांनी कौतुक केले. या वेळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. कार्यक्रमात आझम कॅम्पसच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. एम.सी.ई. सोसायटी आणि डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या वतीने आबेदा इनामदार यांच्या हस्ते राज्यपाल बागडे यांचा पुणेरी पगडी, उपरणे, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पाशा पटेल यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कौशल्याधारित शिक्षणातून स्वावलंबन “व्यावहारिक कौशल्ये आत्मसात केल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करता येतात. तरुणांमध्ये आर्थिक लवचिकता वाढविण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रत्यक्ष कृती कौशल्ये महत्त्वाची आहेत,” असे बागडे यांनी सांगितले. पाशा पटेल यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषीशी संबंधित प्रकल्प आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबेदा इनामदार होत्या. संस्थेची शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी यापुढेही कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
Source link
पालिकेच्या 27 शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल प्रशिक्षण:राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आझम कॅम्पसला भेट देऊन पाहणी केली