![]()
शहरातील रामगिरीनगर येथील ‘नॅचरल डेअरी’वर अन्न व औषध प्रशासनाने अचानक धाड टाकल्यानंतर प्लँटमधील कारभाराची ‘पोलखोल’ झाली. अन्न सुरक्षेच्या निकषांवर झालेल्या तपासणीत ९४ पैकी अवघे १५ गुण मिळाल्याने डेअरीची स्थिती ‘नॉन-कॉम्प्लायन्स’ असल्याचे समोर आले. प्लँटमध्ये तुटलेली फरशी, उघडे दरवाजे, खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळ्या नसणे, पिण्यायोग्य पाण्याचा चाचणी अहवाल उपलब्ध नसणे अशा एकामागून एक त्रुटी आढळल्या. एवढेच नव्हे, तर डेअरीत येणाऱ्या दुधाची प्राथमिक तपासणी, तापमानाची नियमित नोंद आणि भेसळ तपासणीची नोंदवहीही पथकाला मिळाली नाही. दूध साठवण्यासाठी आवश्यक स्टेनलेस स्टीलच्या टाक्यांऐवजी प्लास्टिक कॅनचा वापर होत असल्याचेही उघड झाले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत नव्हता, दूध हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन, हातमोजे आणि डोके झाकण्यासाठी आवश्यक साधनेही नव्हती. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत प्रशासनाने डेअरीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Source link
वैजापूर शहरात डेअरीचा परवाना केला निलंबित:94 पैकी अवघे 15 गुण; 98 किलो पनीर नष्ट