![]()
“नाशिकमध्ये सलग 47 दिवस तीव्र संघर्ष आणि आमरण उपोषण करूनही सरकारने दखल न घेतल्याने हक्कासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत मुंबईत आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री अमानुष दडपशाही केली. मध्यरात्री 2 वाजता मुंबई काँग्रेस कार्यालय आणि दादरच्या टिळक भवनमध्ये घुसून झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारांप्रमाणे उचलण्यात आले. विद्यार्थिनी फ्रेश होत असताना त्यांच्यावर अरेरावी करत ताब्यात घेतले गेले, कार्यकर्त्यांना दुसऱ्या मजल्यावरून फरपटत नेले आणि पोलिसांच्या तब्बल 7 गाड्या बदलून ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन डांबण्यात आले,” असा खळबळजनक आणि गंभीर आरोप आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत केला. नाशिकहून लाँग मार्च काढून मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर मध्यरात्री झालेल्या कथित पोलीस कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने माध्यमांसमोर येत संपूर्ण घटनाक्रम मांडला आणि फडणवीस सरकारच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने केलेल्या या दडपशाहीचा जाहीर निषेध केला. 47 दिवसांचा नाशिकमधील संघर्ष आणि लाँग मार्चची पार्श्वभूमी पत्रकार परिषदेत माहिती देताना विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले, “मागील 47 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी मूलभूत हक्कांसाठी नाशिकमध्ये लढा देत आहेत. ईदगाह मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 25 हजारांहून अधिक विद्यार्थी आणि समाजबांधवांचा मोर्चा काढून तसेच आमरण उपोषण करूनही शासनाने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही.” नाशिक ते मुंबई पायी प्रवास “सरकार दाद देत नसल्याने 20 तारखेपासून विद्यार्थ्यांनी नाशिक ते मुंबई ‘लाँग मार्च’ सुरू केला. भिवंडीपर्यंत रोज 200 ते 300 पोलिसांचे संरक्षण होते. या संपूर्ण आंदोलनाची अधिकृत पूर्वकल्पना राजभवन आणि मुंबई पोलीस आयुक्तांना आधीच देण्यात आली होती.” आझाद मैदान पोलिसांची दुय्यम वागणूक “मुंबईत पोहोचल्यानंतर दोन दिवस विद्यार्थी प्रतिनिधी आझाद मैदान पोलीस ठाण्यात परवानगीसाठी फेऱ्या मारत होते. मात्र, पोलिसांनी अत्यंत तुसडी आणि दुय्यम वागणूक देत ऐनवेळी आंदोलनाची परवानगी नाकारली.” काँग्रेस कार्यालयांत आसरा आणि मध्यरात्री 2 वाजता पोलिसांचे धाडसत्र परवानगी नाकारल्यानंतर मुक्कामाचा प्रश्न निर्माण झाल्याने घडलेला घटनाक्रम त्यांनी स्पष्ट केला. “रस्त्यावर राहायचे कुठे, असा प्रश्न पडल्याने विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी माणुसकीच्या नात्याने दादरचे टिळक भवन आणि मुंबई काँग्रेस कार्यालय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून दिले. सुमारे 200 ते 250 विद्यार्थी येथे शांततेत थांबले होते.” सीएसटी आणि नवघरमध्ये धरपकड; विद्यार्थी बेशुद्ध “रात्री 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अचानक धाडसत्र सुरू केले. सीएसटी स्थानकावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना तिथेच ताब्यात घेतले गेले. नवी मुंबईत वाहनाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना नवघर पोलिसांनी अडवून मारहाण केली. या झटापटीत दोन पोलीस अंगावर पडल्यामुळे अरुण पावरा हा विद्यार्थी जागीच बेशुद्ध पडला. त्यानंतर पोलिसांनी या विद्यार्थ्यांना रस्त्यावर तसेच सोडून पळ काढला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे.” दुसऱ्या मजल्यावरून खेचले, विद्यार्थिनींशी गैरवर्तन अन् 7 गाड्या बदलल्या! टिळक भवनमधील कारवाईचे भीषण वास्तव मांडताना प्रतिनिधी म्हणाले, “मध्यरात्री अडीच वाजता मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या शेडमध्ये झोपलेल्या मुलांना बळजबरीने उठवून पोलिसांनी यलो गेट पोलीस ठाण्यात नेले. दादरच्या टिळक भवनबाहेर येणाऱ्या मुलांनाही रस्त्यावरूनच परस्पर उचलून अज्ञात स्थळी नेण्यात आले.” पदाधिकाऱ्यांना फरपटत नेले “सकाळी 6 ते 7च्या सुमारास स्थानिक पोलीस अधिकारी (काळे साहेब) यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून प्रचंड दबाव आला. ते अचानक अत्यंत आक्रमक झाले. पक्षाचे जबाबदार पदाधिकारी असूनही मला गुन्हेगारासारखे दुसऱ्या मजल्यावरून खेचून, फरफटत नेण्यात आले. सोबत आलेले सोशल मीडिया विभागातील सहकारी राम आणि चेतन यांनाही उचलले गेले.” मुलींशी गैरवर्तन “काही विद्यार्थिनी फ्रेश होत असताना, त्यांच्यावर अत्यंत अरेरावी करत, त्याच अवस्थेत त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले. आम्हाला आधी दादरला नेले आणि त्यानंतर दर अर्ध्या तासाला अशा तब्बल 7 बसेस/वाहने बदलून दिशाभूल करत शेवटी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात डांबले गेले. काँग्रेस नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आमची सुटका झाली.” सेंट्रल किचनचे अन्न म्हणजे ‘विष’; सरकार आदिवासींना दुर्बल समजून दाबतंय आपल्या मूळ मागण्यांवर बोट ठेवत विद्यार्थ्यांनी सरकारला सवाल केला. “शासनाच्या ‘सेंट्रल किचन’ प्रणालीमुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना चार-चार, पाच-पाच तास अगोदर बनवलेले आणि 100 किलोमीटर अंतरावरून थंड झालेले अन्न पुरवले जाते. शेवटच्या शाळेपर्यंत हे जेवण पोहोचेपर्यंत ते अक्षरशः विष बनते. त्यामुळेच दर महिन्याला 50 ते 100 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या बातम्या समोर येतात.” आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय “आमच्या हक्काच्या, चांगल्या शिक्षणाच्या, शाळा वाचवण्याच्या आणि चांगल्या जेवणाच्या मागण्या आहेत. या विद्यार्थ्यांमागे कोणी राजकीय गॉडफादर नाही, ते गरीब आदिवासी आहेत म्हणून सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे.” विद्यार्थ्यांच्या या गंभीर आरोपांमुळे मध्यरात्री झालेल्या पोलीस कारवाईवरून प्रशासनासह गृह मंत्रालयाच्या भूमिकेवर आता राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. —————————————— हेही वाचा… तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा!: नाना पटोलेंची मागणी, म्हणाले- 1972 पेक्षाही महाभीषण दुष्काळ, धरणांवर पहारा हे उशिरा सुचलेले शहाणपण “राज्यात यंदा 1972 पेक्षाही अधिक भयानक आणि दाहक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी ‘अल निनो’चा इशारा दिला होता; तरीही शेतकऱ्यांना महागडी खते, बनावट बियाणे विकून आधी लुटले आणि आता उभी पिके जळत असताना धरणांवर पोलीस बंदोबस्त लावून पहारा बसवला जात आहे. धरणांवर पोलीस बसवणे हे फडणवीस-बावनकुळे सरकारचे उशिरा सुचलेले शहाणपण आहे,” अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
रात्री 2 वाजता पोलिसांचे धाडसत्र, दुसऱ्या मजल्यावरून फरफटत नेले:नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप;