![]()
पैठण परिसरातील गोदावरी नदीपात्रातून गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळूचा बेसुमार उपसा पुन्हा एकदा जोमात सुरू झाला आहे. पैठणच्या उत्कृष्ट दर्जाच्या वाळूला स्थानिक बाजारासह अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या लगतच्या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः सोन्याचा भाव मिळत आहे. त्यामुळे वाळू तस्करांची नजर पुन्हा एकदा या समृद्ध नदीपात्रावर पडली असून, दररोज शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे. महसूल विभागाची कोणतीही परवानगी नसताना, निसर्गाची आणि सरकारी महसुलाची मोठी हानी करत हा काळा बाजार बिनधास्तपणे सुरू आहे. गोदावरीच्या नदीपात्रातून दररोज २० ते २५ हून अधिक हायवा ट्रकमधून सुमारे १०० ते २०० ब्रासपेक्षा जास्त वाळू उपसली जात आहे. एकाच वाहनात साधारणपणे ५ ते ७ ब्रास वाळू ठासून भरली जाते. दुष्काळग्रस्त भागांमध्ये वाळू उपशावर पूर्णपणे बंदी घालण्याचे स्पष्ट नियम आणि उच्च न्यायालयाच्या कडक सूचना व मार्गदर्शक तत्त्वे असतानाही या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. आपेगाव, मायगाव, नायगाव, कुरणपिंप्री, पाटेगाव, टाकळी अंबड आणि मुंगी या संपूर्ण पट्ट्यातून वर्षभर अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असतो. सध्या या बेसुमार उपशामुळे गोदावरीच्या मूळ पात्राची दुरवस्था झाली असून नदीचे पात्र अस्ताव्यस्त पसरले आहे. वाळू तस्करांनी आपल्या या बेकायदेशीर व्यवसायाला पूर्ण संरक्षण मिळावे यासाठी स्थानिक तहसील प्रशासनाला हाताशी धरल्याची जोरदार चर्चा आहे. एमआयडीसी पाचोड आणि बिडकीन ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरमहा लाखो रुपयांची माया पोहोचवली जाते, असा आरोप केला जात आहे. महसूल किंवा पोलिसांचे कोणतेही विशेष पथक कारवाईसाठी फिरकत नाही आणि तस्कर बेधडकपणे वाहनांची ने-आण करत आहेत. या अवैध वाळू तस्करीत पैठण शहरातील लहान-मोठ्या सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीनगर शहरातील काही बड्या राजकीय पुढाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे उघडकीस येत आहे. अनेक पुढाऱ्यांच्या स्वतःच्या गाड्या या वाळू तस्करीत जुंपलेल्या आहेत. याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे. वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी या गाड्यांच्या संरक्षणासाठी आणि मार्गात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या बेसुमार वाळू उपशामुळे नदीच्या नैसर्गिक पात्राचा प्रवाह बदलत असून पर्यावरणाची कधीही न भरून निघणारी हानी होत आहे. प्रशासनाने सर्व नदीपात्रांतील वाळू उपशावर तात्काळ संपूर्ण बंदी घातली पाहिजे. वाळू उपशामुळे जमिनीतील पाणीपातळी कमी होत आहे. नद्यांमध्ये सुरू असलेली वाळूची तस्करी पर्यावरणाची मोठी हानी करत असल्याचे पर्यावरणप्रेमी किशोर पाठक यांनी सांगितले.
Source link
तहसीलचे पथक कागदावरच:पैठणच्या गोदावरी नदीतून रोज 200 ब्रास वाळूचा उपसा; प्रशासनाचे दुर्लक्ष