“राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, कंत्राटदारांची देणी थकलेली असताना आणि सामान्य शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करत असताना हे सरकार नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यासाठी तब्बल 35 हजार कोटी रुपयांची उधळपट्टी करायला निघाले आहे. आधी दुनियाभराची पापे कराय
.
वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी राज्यातील दुष्काळी स्थिती, शेतकरी कर्जमाफी, पुण्यातील एमपीएससी आंदोलन, तिजोरीवरील 10 लाख कोटींचे कर्ज, ओबीसी समाजाचे प्रश्न आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर अत्यंत तिखट शब्दांत तोफ डागली.
तिजोरी विकली, 10 लाख कोटींचे कर्ज; मग कुंभमेळ्यावर 35 हजार कोटी कशासाठी?
राज्याच्या आर्थिक डबघाईचा पाढा वाचताना विरोधी पक्षनेते म्हणाले, “महाविकास आघाडीचे सरकार गेले तेव्हा राज्यावर 2 लाख कोटींचे कर्ज होते. आज ते थेट 10 लाख कोटींवर पोहोचले आहे. महायुतीच्या काळात राज्यावर तब्बल 8 लाख कोटींचे नवे कर्ज लादले गेले. महाराष्ट्र पूर्णपणे आर्थिक गर्तेत लोटला गेला असून सरकार इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली फक्त कमिशन लाटण्याचे काम करत आहे.”

धर्माच्या नावावर भावनात्मक धंदे बंद करा
“शक्तिपीठ महामार्ग, समृद्धीचे प्रकल्प आणि आता कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची उधळपट्टी सुरू आहे. दुसरीकडे 2018च्या दुष्काळ पॅकेजचे निम्मे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आमची स्पष्ट मागणी आहे की, हे भावनात्मक उद्योग बंद करा. हवे तर आणखी २ लाख कोटींचे कर्ज काढा, पण राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करा आणि प्रतिहेक्टरी १ लाख रुपयांची तातडीची दुष्काळी मदत द्या.”
मुख्यमंत्र्यांच्या मैत्रीपोटी MPSC अध्यक्षांची पाठराखण
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. “एमपीएससीचा सावळागोंधळ उघड झाल्यानंतर सरकारने सचिवाची बदली केली; मग वादग्रस्त अध्यक्षांचा राजीनामा का घेतला जात नाही? मुख्यमंत्री फडणवीस आणि अध्यक्षांमध्ये अशी कोणती घट्ट मैत्री आहे की लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावूनही त्यांना वाचवले जात आहे? मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पुनर्विचार करून अध्यक्षांची हकालपट्टी करावी.”
पुण्यात 10-10 पोरं ढेकणांमध्ये राहतात
“ग्रामीण भागातील मायबाप उपाशी राहून मुलांना पुण्यात अभ्यासासाठी पाठवतात. मुले एका खोलीत 10-10 जण ढेकणांच्या सोबतीने राहतात, रात्रंदिवस काबाडकष्ट करतात. मात्र, 2022-23च्या परीक्षांचे निकाल अजून लागत नाहीत. टीसीएससारख्या खासगी कंपन्यांमार्फत होणाऱ्या परीक्षांमध्ये 70 ते 80 लाख रुपये घेऊन वर्ग-1 आणि वर्ग-2 ची पदे मॅनेज केली जातात. 70 हजारांहून अधिक पदे रिक्त असतानाही भरती रोखली जात आहे. राहुल गांधी लवकरच या आंदोलनाला पुण्यात भेट देणार असून, हा लढा आणखी तीव्र केला जाईल.”
शिंदे समितीच्या धर्तीवर ओबीसी व भटक्यांसाठी स्वतंत्र समिती हवी
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीचा संदर्भ देत त्यांनी ओबीसी आरक्षणावर भूमिका मांडली. “काल झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मी स्वतः उपस्थित होतो. ज्याप्रमाणे गरीब मराठा समाजासाठी ‘शिंदे समिती’ स्थापन करण्यात आली, त्याच धर्तीवर राज्यातील गरीब ओबीसी आणि विमुक्त जाती-भटक्या जमातींच्या (VJNT) सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा सर्व्हे करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी, अशी मागणी आम्ही केली. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. केवळ आश्वासने देऊन भागणार नाही, तर ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावे आणि विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवावी.”
पंतप्रधानांच्या 25 वर्षांत देशाचे ’12 वाजले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय सेवेच्या २५ वर्षांच्या उत्सवावर वडेट्टीवारांनी बोचरी टीका केली. “पंतप्रधान म्हणून 12 वर्षे झाली आणि या काळात देशाचे अक्षरशः ’12 वाजले’ आहेत. ही 25 वर्षांची सेवा नसून देशाला 50 वर्षे मागे नेणारी काळीकुट्ट कारकीर्द आहे. इंदिराजींनी सामान्य माणसासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते; परंतु मोदींच्या काळात बँकांमधून 16 लाख कोटी रुपयांचे उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यात आले. देशातील बँका खिळखिळ्या झाल्या असून उद्योजक सुरक्षितता नसल्याने परदेशात पळ काढत आहेत.”
फक्त जुमलेबाजी आणि श्रेयवाद
“काँग्रेसने पायाभरणी केलेल्या योजनांवर स्वतःचे नाव कोरणे आणि 20 टक्के कमिशन लाटून रस्ते बांधणे यापलीकडे देशात कोणतेही नवे धरण किंवा मोठी निर्मिती झालेली नाही. हे सरकार केवळ मतांसाठी जनतेला ‘लॉलीपॉप’ आणि ‘चॉकलेट’ देणारे जुमलेबाज सरकार आहे,” असा सडकून आरोप वडेट्टीवार यांनी केला.
———————————————–
हेही वाचा…
दीड दिवसापूर्वीच फोन, तो निघून गेला यावर विश्वासच बसत नाही: नाना म्हणजे स्वतःला सतत तासणारा गुणी कलावंत, अमोल पालेकर भावुक

“दीड दिवसापूर्वीच त्याचा फोन आला होता… माझ्या नवीन नाटकाच्या प्रयोगाला येऊ शकलो नाही म्हणून ‘पुढच्या प्रयोगाला नक्की येईन रे’ असे हक्काने सांगणारा माझा धाकटा भाऊ आज अचानक निघून गेला, या धक्क्यातून मी अजूनही सावरू शकलेलो नाही. सकाळी जेव्हा ही बातमी कळाली, तेव्हा संपूर्ण शरीर सुन्न झाले. अत्यंत बलदंड, रोज नियमित व्यायाम करणारा आणि तब्येतीची काटेकोर काळजी घेणारा माणूस इतक्या अचानक आपल्यातून निघून जाईल, यावर मन विश्वासच ठेवायला तयार नाही,” अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी