![]()
“लोकांनी आम्हाला संसदेत निवडून कशासाठी पाठवले आहे? सामान्य जनतेच्या हक्कासाठी सरकारला आणि प्रशासकीय यंत्रणांना प्रश्न विचारण्यासाठीच ना! पण दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने निवडणूक आयोगाकडे जात असताना लोकप्रतिनिधींना बंदुकीच्या धाकावर अडवले जाते, महिला खासदारांशी गैरवर्तन केले जाते. देशात नियम, कायदे आणि संविधानाची पायमल्ली करून एकाच व्यक्तीच्या मनमर्जीने कारभार चालणार असेल, तर संविधानाला अर्थ काय उरला? इंग्रजांच्या काळात जसे ‘सायमन गो बॅक’ म्हटले जायचे, तशीच वेळ आता या हुकूमशाही वृत्तीच्या सत्ताधाऱ्यांना ‘गो बॅक’ म्हणण्याची आलेली आहे,” असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील खासदारांचे आंदोलन, केंद्रीय निवडणूक आयोगातील कथित मनमानी, मतदार यादीतील घोळ, राज्यातील दुष्काळ आणि भाजपच्या राजकीय खेळींवर सडकून टीका केली. फॉर्म-6चा निर्णय परस्पर कसा घेतला? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर ताशेरे ओढताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हा केवळ राजकीय पक्षांचा विषय राहिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही यावर गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. इतर निवडणूक आयुक्तांना अंधारात ठेवून आणि कोणालाही विश्वासात न घेता ‘फॉर्म 6’ आणि मतदार वगळणीबाबतचा निर्णय ज्ञानेश कुमार यांनी परस्पर एकट्याने कसा घेतला? हा थेट मनमानी कारभार असून नियमांची पायमल्ली आहे.” इलेक्शन रिफॉर्म्स आणि बॅलेट पेपरची गरज “देशात लोकशाही टिकवायची असेल, तर ज्ञानेश कुमार यांनी या सर्व गोंधळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अमेरिका किंवा जगातील प्रगत देश ज्याप्रमाणे पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेत आहेत, त्याचप्रमाणे भारतातही व्यापक निवडणूक सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढायला हवा.” दिल्लीत खासदारांना 100 मीटरही चालू दिले नाही; मग मतदारांनी आम्हाला निवडून कशासाठी दिले? दिल्लीतील संसद ते निर्वाचन सदन मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या अडवणुकीवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “आम्ही कोणत्याही हिंसेचा मार्ग अवलंबलेला नव्हता. आम्ही शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून पदयात्रा काढत होतो. खासदारांना अवघे 100 मीटर चालू दिले नाही. तिथे महिला खासदारांशी दिल्ली पोलिसांनी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन केले, मात्र पोलीस साधी तक्रार नोंदवून घ्यायलाही तयार नाहीत.” ‘गो बॅक’ म्हणण्याची वेळ “जनतेने आम्हाला संसदेत पाठवले ते प्रश्न विचारण्यासाठी. तिथे आम्हाला प्रश्नच विचारू द्यायचे नसतील, तर मग लोकशाहीचा देखावा कशाला करता? स्वातंत्र्यापूर्वी ‘सायमन गो बॅक’च्या घोषणा दिल्या जायच्या, आज जनतेवर या सत्ताधाऱ्यांना तशाच प्रकारे ‘गो बॅक’ म्हणण्याची वेळ आणून ठेवली आहे.” आंदोलनातील खासदार कमी झाल्याच्या दाव्याची हवा काढली; ‘कामाचे विकेंद्रीकरण’ दिल्लीतील आंदोलनात खासदारांची उपस्थिती कमी झाल्याच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी नियोजनाचा खुलासा केला. “सगळे खासदार दिल्लीत बसून राहिले, तर गावागावांत आणि मतदारसंघांत कोण जाणार? ‘इंडिया’ आघाडीने कामाचे आणि जबाबदारीचे पद्धतशीर विभाजन केले आहे. समाजवादी पक्षाचे नेते उत्तर प्रदेशात रस्त्यावर उतरले आहेत, तर महाराष्ट्रातील नेते आपापल्या भागांत संघर्ष करत आहेत.” दुष्काळ आणि आंदोलनांचा ताळमेळ “महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. काल खासदार निलेश लंके अहिल्यानगरमध्ये दुष्काळी कामात आणि आंदोलनात व्यस्त होते. आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील दिल्लीत होते, आता मी आज रात्री दिल्लीला रवाना होत आहे. मी दोन दिवस तिथे राहिल्यावर धैर्यशील दादा सोलापूरला परततील आणि निलेश लंके दिल्लीत मोर्चा सांभाळतील. आम्ही शेतकरी आणि जनता दोघांनाही वाऱ्यावर सोडलेले नाही.” पक्ष फोडले, घरे फोडली; तरीही विरोधकांना ‘अराजकतावादी’ म्हणता? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आंदोलनाला ‘अराजकतावादी’ ठरवल्याच्या विधानावर सुप्रिया सुळे यांनी जोरदार पलटवार केला. “विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, मात्र ते कोणाला चिकटले नाहीत; उलट आपल्या वाशिंग मशिनमध्ये टाकून भ्रष्टाचाऱ्यांनाच यांनी पावन करून घेतले. त्यानंतर विरोधकांचे पक्ष फोडले, कुटुंबे फोडून घरे उद्ध्वस्त केली. सर्व प्रयोग करून झाले आणि आता पाप उघडे पडू लागल्यामुळे विरोधकांना बदनाम करण्यासाठी भाजपने ‘अराजकता’ हा नवा शब्द शोधून काढला आहे.” जाहिरातबाजीत जनतेचे लक्ष विचलित करण्याचा डाव “पंतप्रधानांच्या 25 वर्षांच्या सेवेचा गवगवा करण्यासाठी कोट्यवधींच्या जाहिराती दिल्या जात आहेत. कालपर्यंत वर्तमानपत्रांत जाहिरातींचे रकाने दिसत होते; परंतु आज वृत्तपत्रे, टीव्ही वाहिन्या आणि सोशल मीडिया केवळ विरोधकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांच्या बातम्यांनी व्यापला गेला आहे. सत्ताधाऱ्यांच्या जाहिरातबाजीला जनतेने पूर्णपणे नाकारले असून सत्य रस्त्यावर दिसत आहे,” असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. ——————————————— हेही वाचा… 35 हजार कोटी खर्चून कुंभमेळ्यात डुबकी मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना वाचवा:मित्राला वाचवण्यासाठी MPSC चे वाटोळे, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल “राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, कंत्राटदारांची देणी थकलेली असताना आणि सामान्य शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करत असताना हे सरकार नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यासाठी तब्बल 35 हजार कोटी रुपयांची उधळपट्टी करायला निघाले आहे. आधी दुनियाभराची पापे करायची आणि मग 35 हजार कोटी खर्चून कुंभमेळ्यात डुबकी मारायची, याने कसले पुण्य मिळणार? सरकारला खरेच पुण्य कमवायचे असेल, तर संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी उभे राहा आणि त्याचे प्राण वाचवा. त्या एका डुबकीपेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला जगवण्यातून लाख पटीने अधिक पुण्य मिळेल,” असा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
'सायमन गो बॅक'प्रमाणे सत्ताधाऱ्यांना 'गो बॅक म्हणण्याची वेळ आलीये!:ज्ञानेश कुमारांनी मनमानीने देश चालवू नये, तत्काळ राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळे आक्रमक