![]()
ऊर्जा निर्मितीपासून साखर, वस्त्रोद्योग, रसायने, पेट्रोकेमिकल्स, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती, कागद उद्योग आणि रिफायनरीजपर्यंत विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बॉयलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे बॉयलरची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता यांचा थेट संबंध औद्योगिक उत्पादकता, कामगारांची सुरक्षितता, ऊर्जेचा कार्यक्षम वापर, पर्यावरण आणि देशाच्या औद्योगिक स्पर्धात्मकतेशी आहे. या पार्श्वभूमीवर बॉयलर क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात कामगार विभागाच्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘बॉयलर इंडिया 2026’ कार्यशाळा, चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे उद्घाटन ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाच्या माध्यमातून बॉयलर क्षेत्रातील उत्पादक, उद्योजक, तज्ज्ञ, अभियंते, ऑपरेटर, ग्राहक आणि विद्यार्थी यांना एकाच व्यासपीठावर आणून तंत्रज्ञान व ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय.ए. कुंदन, विकास आयुक्त (असंघटित कामगार) सुशिल खोडवेकर, केंद्रीय बाष्पके मंडळाचे सचिव तथा तांत्रिक सल्लागार (बाष्पके) संदीप कुंभार, बाष्पके संचालनालयाचे संचालक संदीप चिवटे यांच्यासह विविध अधिकारी, तज्ज्ञ, अभियंते, उत्पादक आणि औद्योगिक प्रतिनिधी उपस्थित होते. AI तंत्रज्ञानाचा वापर करून बिघाडापूर्वीच उपाययोजना करण्याची गरज कामगार मंत्री फुंडकर म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही आता भविष्यातील संकल्पना राहिलेली नसून आधुनिक उद्योगांची गरज बनली आहे. बॉयलरमध्ये बिघाड झाल्यानंतर सूचना मिळण्याऐवजी बिघाड होण्याची शक्यता आधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील का, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी तज्ज्ञ, अभियंते आणि उद्योग क्षेत्राने AI तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा. ‘बॉयलर इंडिया 2026’च्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, नवीन संकल्पना, औद्योगिक सुरक्षितता आणि कार्यक्षमतेशी संबंधित उपाययोजनांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ई-गव्हर्नन्समध्ये बाष्पके संचालनालयाची उल्लेखनीय कामगिरी शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स आणि नागरिककेंद्री सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. या उपक्रमात बॉयलर संचालनालयाने राज्यातील 68 विभागांमध्ये चौथा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल मंत्री फुंडकर यांनी संचालनालयाचे अभिनंदन केले. बॉयलर क्षेत्रातील तपासणी, मान्यता, लेखापरीक्षण यांसारख्या विविध प्रक्रियांमध्ये अधिक सुलभता आणि पारदर्शकता आणण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगांना आवश्यक सेवा वेळेत उपलब्ध व्हाव्यात आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ व्हाव्यात, यासाठी ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात कौशल्य विकास केंद्र; युवकांना रोजगाराच्या संधी बॉयलर उद्योगाच्या भविष्यासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. उच्च दाब वेल्डिंग, बॉयलर निर्मिती, तपासणी, विनाशरहित चाचणी (NDT), देखभाल, स्वयंचलन आणि प्रगत बॉयलर संचालन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत असून, त्याचे रूपांतर बॉयलर कौशल्य, वेल्डिंग, तपासणी आणि औद्योगिक सुरक्षिततेसाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल, असे फुंडकर यांनी सांगितले. ‘सेफ्टी फर्स्ट’ प्रत्यक्ष कार्यपद्धती झाली पाहिजे बॉयलर क्षेत्रात उच्च दाब, उच्च तापमान आणि गुंतागुंतीच्या औद्योगिक प्रक्रियांचा समावेश असल्याने सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. कामगारांच्या मेहनतीमुळे उद्योग उभे राहतात आणि उद्योगांच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामुळे कामगारांची सुरक्षितता ही उद्योगांची मूलभूत जबाबदारी आहे. ‘सेफ्टी फर्स्ट’ ही केवळ घोषणा न राहता प्रत्येक उद्योगातील प्रत्यक्ष कार्यपद्धती बनली पाहिजे. बॉयलरची निर्मिती, स्थापना, तपासणी, संचालन आणि देखभाल या प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे, असेही मंत्री फुंडकर यांनी सांगितले. ‘बॉयलर इंडिया 2026’मध्ये सहभागी उद्योजक, उत्पादक, अभियंते, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानासोबत आवश्यक कौशल्ये आत्मसात करून त्यांचा उपयोग उद्योगातील सुरक्षितता, कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. निर्मितीपासून तपासणीपर्यंत सुरक्षा निकषांचे पालन आवश्यक वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, बॉयलर निर्मितीमध्ये प्लेट रोलिंग, डिसिंग, ट्यूब शीट, ट्यूब्स, वेल्डिंग, विविध चाचण्या, हायड्रो टेस्टिंग आणि शेल टेस्टिंग यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया असतात. या प्रत्येक प्रक्रियेत निर्धारित तांत्रिक मानके आणि सुरक्षितता निकषांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. ‘बॉयलर इंडिया’च्या माध्यमातून उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणता येत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची माहिती, उत्पादनांची देवाणघेवाण आणि उद्योगातील व्यावसायिक संधी वाढण्यास मदत होईल. या प्रदर्शनातून उद्योग क्षेत्राला व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास सावकारे यांनी व्यक्त केला. देश-विदेशातील 246 प्रदर्शकांचा सहभाग कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय.ए. कुंदन यांनी ‘बॉयलर इंडिया 2026’च्या आयोजनाचे कौतुक केले. बॉयलर हे औद्योगिक क्षेत्राचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, त्याबाबत व्यापक जनजागृती आणि माहितीची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ‘बॉयलर इंडिया’चे हे चौथे आयोजन असून, यंदाच्या प्रदर्शनात देश-विदेशातील सुमारे 246 प्रदर्शकांनी सहभाग घेतला आहे. बॉयलरची भूमिका केवळ उष्णता निर्मितीपुरती मर्यादित राहिलेली नाही. ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना देणे यामध्येही बॉयलर तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे कुंदन यांनी नमूद केले. केंद्राच्या सुधारणा आणि नियामक व्यवस्थेवर चर्चा केंद्रीय बाष्पके मंडळाचे सचिव तथा तांत्रिक सल्लागार संदीप कुंभार यांनी बॉयलर क्षेत्रातील केंद्र शासनाच्या सुधारणा आणि नव्या नियामक व्यवस्थेची माहिती दिली. उत्पादक, वापरकर्ते, दुरुस्तीदार, फॅब्रिकेटर्स आणि अभियंते यांच्यामध्ये तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण होणे आवश्यक असून, त्यासाठी ‘बॉयलर इंडिया’ हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध स्टॉलची पाहणी उद्घाटनानंतर कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. विविध उत्पादकांनी मांडलेले बॉयलर, आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. संबंधित प्रतिनिधींशी संवाद साधून उद्योगातील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनांविषयी माहितीही जाणून घेतली. यावेळी बॉयलरच्या विविध तंत्रज्ञानावर प्रकाश टाकणारा लघुचित्रपट दाखविण्यात आला. प्रदर्शनात विविध प्रकारचे बॉयलर, आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा उपकरणे आणि संबंधित सेवांची माहिती देण्यात आली. बॉयलर क्षेत्रातील तंत्रज्ञान, सुरक्षितता, नियम आणि कार्यपद्धती याबाबतच्या माहितीपूर्ण पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाष्पके संचालनालयाचे संचालक संदीप चिवटे यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपसंचालक ए.एम. झुंजुरे यांनी केले. विविध राज्यांतील अधिकारी, बॉयलर क्षेत्रातील तज्ज्ञ, अभियंते, उत्पादक, औद्योगिक प्रतिनिधी, ऑपरेटर आणि प्रदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेही वाचा… हिंगोलीत वडेट्टीवारांचा सरकारवर चौफेर हल्लाबोल:शेतकरी आत्महत्या, 6 तास लोडशेडिंग अन् शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा महाराष्ट्र 1972 नंतरच्या सर्वात भीषण दुष्काळी संकटाला सामोरे जात असून, मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तलावांमध्ये पाणी शिल्लक नाही, विहिरी कोरड्या पडल्या आहेत आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ शासन निर्णय (GR) काढून शेतकऱ्यांची बोळवण न करता तातडीने हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सविस्तर वाचा…
Source link
बॉयलर उद्योगात ‘सेफ्टी फर्स्ट’सह AI तंत्रज्ञानाला चालना:कुशल मनुष्यबळासाठी नागपुरात कौशल्य विकास केंद्र उभारणार – आकाश फुंडकर