![]()
कचनेर तांडा नं. 5 परिसरातील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने शेतावर छापा टाकला. या कारवाईत गांजाची लहान-मोठी अशी तब्बल 241 झाडे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन 182.02 किलो असून, त्याची अंदाजे किंमत 27 लाख 30 हजार 300 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान शेतात गांजाची झाडे लागवड केलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी पंचांसमक्ष सर्व झाडांची मोजणी व वजन केले. त्यामध्ये एकूण 241 झाडांचे वजन 182.02 किलो भरले. त्यानंतर हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी यमुना मांगीलाल चव्हाण, कवरसिंग रामजी चव्हाण, प्राणहंस गोपा चव्हाण, गणेश प्राणहंस चव्हाण आणि अंकुश गोपा चव्हाण, सर्व रा. कचनेर तांडा नं. 5, ता. जि. छत्रपती संभाजीनगर, यांच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलीस विभागासोबत महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. नायब तहसीलदार कैलास वैजीनाथराव वाघमारे, सहाय्यक कृषी अधिकारी पूनम डिगंबर जाधव आणि तलाठी संजय बाजीराव ठोंबे यांनी कारवाईत सहकार्य केले. पोलीस पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे, उत्तम नागरगोजे, तसेच विठ्ठल एडके, पांडुरंग बढे, निवृत्ती मदने, रकिब शेख, परमेश्वर आढे, विजयसिंग जारवाल, पंकज पाटील, सतीश देवकर, सचिन थोरात, पोलीस अंमलदार मुंजाजी डोईफोडे, लहू गव्हाणे, महिला पोलीस हवालदार भारती राठोड, महिला पोलीस अंमलदार सीमा घुगे, अनिता बनसोड आणि योगिता बोकील यांचा समावेश होता. चिकलठाणा पोलिसांच्या या कारवाईमुळे कचनेर तांडा परिसरातील अवैध गांजा लागवडीवर कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थांची अवैध लागवड आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. हेही वाचा…. महाराष्ट्रात 70,000 कोटींचा हरित डेटा सेंटर पार्क:रिन्यूचा राज्य सरकारसोबत मोठा करार, 7,000 हून अधिक रोजगारांची शक्यता महाराष्ट्राच्या डिजिटल आणि हरित पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. भारतातील आघाडीची स्वच्छ ऊर्जा कंपनी रिन्यू प्रायव्हेट लिमिटेडच्या पूर्ण मालकीची उपकंपनी रिन्यू विंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने महाराष्ट्र सरकारसोबत ₹70,000 कोटींच्या हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. मुंबई महानगर प्रदेशात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची योजना असून, प्रकल्पाची एकूण नियोजित क्षमता 750 मेगावॅट इतकी असेल. सविस्तर वाचा…
Source link
गोपनीय माहितीची खातरजमा करून चिकलठाणा पोलिसांचा छापा:कचनेर तांड्यात गांजाची 241 झाडे जप्त, 182.02 किलो मुद्देमालाची किंमत 27.30 लाख रुपये; 5 जणांवर NDPS अंतर्गत कारवाई