Headlines

अंबरनाथमध्ये 19.99 कोटींचा ‘उमेद मॉल’:महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार वर्षभर हक्काची बाजारपेठ




महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना कायमस्वरूपी आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अंबरनाथ येथे ‘उमेद मॉल’ अर्थात जिल्हा विक्री केंद्र उभारण्याच्या कामाला महाराष्ट्र शासनाने 19 कोटी 99 लाख 60 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाने 7 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला जाणार आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना केवळ विविध प्रदर्शनांमध्ये किंवा हंगामी बाजारपेठेत विक्रीची संधी न मिळता, वर्षभर उपलब्ध असलेली कायमस्वरूपी बाजारपेठ निर्माण करणे, हा ‘उमेद मॉल’ योजनेचा प्रमुख उद्देश आहे. 19.99 कोटींच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता अंबरनाथ येथील ‘उमेद मॉल’च्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पाची एकूण अंदाजपत्रकीय किंमत 19 कोटी 99 लाख 59 हजार 903 रुपये 93 पैसे इतकी आहे. या प्रकल्पासाठी प्रस्तावित बांधकाम क्षेत्र 5,175.42 चौरस मीटर आहे. जिल्ह्यातील महिला स्वयं-सहाय्यता समूहांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी आधुनिक आणि सुविधायुक्त केंद्र उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या मॉलची उभारणी केली जाणार आहे. प्रकल्पामध्ये मुख्य इमारतीसोबतच पावसाच्या पाण्याचे संधारण, सौरऊर्जा व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्प, फर्निचर, पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची सुविधा, विद्युतीकरण, HVAC प्रणाली तसेच अग्निशमन यंत्रणा आदी आवश्यक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. महालक्ष्मी सरसचा शब्द प्रत्यक्षात मुंबईतील महालक्ष्मी सरस कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला होता. त्यावेळी महिला बचत गटांना कायमस्वरूपी विक्रीची जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला होता. अंबरनाथ येथील ‘उमेद मॉल’ला मिळालेली प्रशासकीय मान्यता ही त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी मेहनतीने तयार केलेल्या वस्तूंना अनेकदा स्थानिक पातळीवरच मर्यादित बाजारपेठ मिळते. प्रदर्शन, मेळावे किंवा विशेष उपक्रमांच्या माध्यमातून काही काळ विक्रीची संधी मिळत असली, तरी वर्षभर उत्पादन विकण्यासाठी नियमित बाजारपेठ उपलब्ध नसते. ही अडचण दूर करण्यासाठी ‘उमेद मॉल’ची संकल्पना राबविण्यात येत आहे. खाद्यपदार्थांपासून हस्तकलेपर्यंत उत्पादनांची विक्री अंबरनाथच्या ‘उमेद मॉल’मध्ये ठाणे जिल्ह्यातील महिला स्वयं-सहाय्यता समूहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना विक्रीची संधी मिळणार आहे. यामध्ये खाद्यपदार्थ, मसाले, पापड, लोणची, हस्तकला वस्तू, कपडे आणि इतर स्थानिक उत्पादनांचा समावेश असेल. यामुळे महिलांना आपल्या उत्पादनांची थेट ग्राहकांपर्यंत विक्री करता येणार असून, मध्यस्थांची भूमिका कमी होण्यास मदत होणार आहे. उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळाल्याने बचत गटांच्या उत्पन्नात वाढ होण्यासह ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 13 जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारण्याची योजना महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाराही महिने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यात टप्प्याटप्प्याने ‘उमेद मॉल’ उभारण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे-अंबरनाथसह 13 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या केंद्रांमुळे बचत गटांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेबरोबरच व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला उद्योजकांना आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग सुधारण्यासही प्रोत्साहन मिळू शकते. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ ‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांना केवळ आर्थिक सहाय्य किंवा प्रशिक्षण देण्यापेक्षा त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. उत्पादन तयार केल्यानंतर त्याची विक्री कुठे आणि कशी करायची, हा अनेक महिला उद्योजकांसमोरील महत्त्वाचा प्रश्न असतो. ‘उमेद मॉल’च्या माध्यमातून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंबरनाथ येथील प्रकल्पाला मिळालेली प्रशासकीय मान्यता त्यामुळे महिला बचत गटांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. मॉल प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या स्थानिक उत्पादनांना एकाच छताखाली बाजारपेठ मिळणार आहे. महिलांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि बचत गटांच्या माध्यमातून अधिकाधिक महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, या उद्देशाने ‘उमेद मॉल’ उभारले जात आहेत. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून दिलेला बाजारपेठेचा शब्द अंबरनाथमधील 19.99 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून प्रत्यक्षात उतरू लागला असून, या प्रकल्पामुळे ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभराची हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेही वाचा… हिंगोलीत वडेट्टीवारांचा सरकारवर चौफेर हल्लाबोल:शेतकरी आत्महत्या, 6 तास लोडशेडिंग अन् शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा महाराष्ट्र 1972 नंतरच्या सर्वात भीषण दुष्काळी संकटाला सामोरे जात असून, मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तलावांमध्ये पाणी शिल्लक नाही, विहिरी कोरड्या पडल्या आहेत आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ शासन निर्णय (GR) काढून शेतकऱ्यांची बोळवण न करता तातडीने हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *