Headlines

रवी परांजपे यांच्या निवडक चित्रांचे 'काष्ठ चित्र' माध्यमात अनावरण:स्मिता परांजपे यांच्या हस्ते अनावरण; चारुहास-भाग्यश्री पंडित यांनी साकारल्या कलाकृती




सर्जनशीलता म्हणजे एखाद्या परिचित गोष्टीकडे नव्या नजरेतून पाहणे आणि त्यातून अनपेक्षित, नाविन्यपूर्ण घडवून आणणे होय. वेगळा विचार करता येणे हीच खऱ्या कलाकाराची ओळख आहे. लेझर कटिंग आणि काष्ठ चित्र या कलाप्रकारात प्राविण्य मिळवत चारुहास पंडित व भाग्यश्री पंडित यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत देश-विदेशातील मानचिन्हांवर आपल्या कार्याची मोहोर उमटविली आहे. रवी परांजपे यांच्या मूळ चित्रांमधील नेमके बारकावे, वैशिष्ठ्यपूर्ण रचना आणि लय काष्ठ चित्रांमध्ये अचूकपणे टिपली आहे, ही अचंबित करणारी गोष्ट आहे, असे गौरवोद्‌गार स्मिता रवी परांजपे यांनी काढले. चित्रकला, इलस्ट्रेशन्स आणि बिल्डिंग पर्स्पेक्टिव्ह ड्रॉईंग्स व पेंटींग्जच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा स्वतंत्र व अजरामर ठसा उमटवणारे ज्येष्ठ चित्रकार कै. रवी परांजपे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सृजन आर्ट गॅलरीचे संचालक व पुण्यातील कलाकार दांपत्य चारुहास पंडित आणि भाग्यश्री पंडित यांनी कै. परांजपे यांची निवडक चार चित्रे ‘काष्ठ चित्र’ या अतिशय नावीन्यपूर्ण माध्यमात साकारली आहेत. या चित्रांचे अनावरण स्मिता परांजपे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होते. नारायण पेठेतील सृजन आर्ट गॅलरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संकल्पनेविषयी बोलताना चारुहास पंडित म्हणाले, जाहिरात क्षेत्रात काम करीत असताना तोच तोचपणा टाळण्यासाठी आम्ही या कलाप्रकाराकडे वळलो. स्वत:ला समाधान देईल अशी कलानिर्मिती करावी या हेतूने लेझर टेक्नॉलॉजीवर काम करत असताना लाकूड या माध्यमात रस निर्माण झाला आणि काष्ठ चित्रांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. या चित्रातील लाकूड हे नैसर्गिक रंगाचे असून जगात पहिल्यांदाच अशा पद्धतीने ही कला समोर आणली आहे. रवी परांजपे यांच्या चित्रांमधून प्रभावित होत त्यांच्या चित्रांची काष्ठ चित्रे साकारली आहेत. स्मिता परांजपे पुढे म्हणाल्या, रवीजींची मूळ रंगीत चित्रे लाकडाच्या नैसर्गिक रंगछटा आणि पोतामध्ये रुपांतरीत केली गेली असली तरी त्या मूळ कलाकृतीचे सौंदर्य कुठेही कमी झालेले नाही. उलट लाकडाचा नैसर्गिक पोत, सूक्ष्म छटा आणि त्रिमितीमुळे या कलाकृतींना एक नवा आयाम मिळाला आहे. रवीजींच्या कलाकृतींच्या काष्ठ चित्रांची निर्मिती म्हणजे एका सृजन कलाकाराने दुसऱ्या सृजन कलाकाराच्या कलाकृतींना आपल्या कला माध्यमातून दिलेली सुंदर आदरांजली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *