![]()
हिंगोली जिल्ह्यात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मागीलवेळच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या ६ हजाराने घटली असून यावर्षी १० हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार नोंदणीसाठी प्रचार प्रसारामध्ये निवडणुक प्रशासन अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच मतदार नोंदणीची संख्या घटल्याची चर्चा सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत मागील वर्षी हिंगोली जिल्हयातून १६ हजार पदवीधर मतदारांनी नोंदणी केली होती. त्यानंतर यावर्षी मतदारांची संख्या वाढणे अपेक्षीत होते. मात्र यावर्षी निर्धारीत कालावधीत ता. ६ ऑक्टोबरपर्यंत केवळ १० हजार ३१५ मतदारांनीच नोंदणी केली आहे. मागील वेळच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या तब्बल ६ हजाराने घटली आहे. पदवीधर मतदार संघाची निवडणुक जाहिर झाल्यानंतर मतदारांच्या नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून म्हणावी तशी प्रचार प्रसिध्दी झालीच नाही. या शिवाय राजकिय पक्षांच्या कार्यरर्त्यांकडूनही पदवीधरांना नोंदणीसाठी साद घालण्यात आलीच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच वेळी मतदारांची संख्या घटल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावेळी होणाऱ्या या निवडणुकीत हिंगोली जिल्हयात ३६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान शांततेच पार पडावे यासाठी २३० कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून शुक्रवारी ता. २३ रोजी सकाळी आठ ते दुपारी चार यावेळेत या मतदान केंद्रावर मतदान होईल. जिल्ह्यात एकूण १० हजार ३१५ मतदारांची नोंदणी झाली असून त्यामध्ये ८ हजार ३३७ पुरुष आणि १ हजार ९७८ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील बंदोबस्तासाठी ३६ पोलीस अंमलदार आणि एक गस्त वाहन नियुक्त करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य पथकांची व्यवस्था मतदानाच्या दिवशी मतदार तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांच्या माध्यमातून मतदान केंद्रनिहाय आरोग्य पथके स्थापन करण्यात आली आहेत.
Source link
हिंगोली जिल्ह्यात पदवीधर मतदारांची संख्या 6 हजाराने घटली:नोंदणीच्या प्रचार प्रसारात प्रशासन अपयशी, यावर्षी 10 हजार मतदार करणार मतदान