Headlines

कात्रज घाटात एसटी-रिक्षाचा भीषण अपघात:रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, तीन प्रवासी गंभीर जखमी; चालक ताब्यात




कात्रज घाटातील बोगद्याजवळ गुरुवारी सायंकाळी एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षातील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:२५ वाजता आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेटहून विटा (सांगली) कडे जाणारी एसटी बस (क्रमांक MH 10 DT 2697) कात्रज घाट बोगदा ओलांडून पुढे जात होती. त्याचवेळी खेड शिवापूरकडून स्वारगेटच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाची (क्रमांक MH 12 GS 9695) बसला दुसऱ्या वळणावर समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षाचालक हनुमंत रमेश हंगरगे (वय ४२, रा. सुखसागर नगर, बिबेवाडी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रिक्षातील जखमी प्रवाशांमध्ये राजेश इंगवले (वय ४८, रा. गोकुळ नगर, कात्रज-कोंढवा रोड), दशरथ निरगुडे (वय ४३, रा. अप्पर बिबेवाडी) आणि शहाजी लक्ष्मण शिवदे (वय ४१, रा. अप्पर इंदिरानगर, बिबेवाडी) यांचा समावेश आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आंबेगाव पोलिसांनी एसटी बस चालक जालिंदर विष्णू शिंदे (वय ५३, रा. शेडगेवाडी, खानापूर, जि. सांगली) याला ताब्यात घेतले आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत होता का किंवा अपघाताचे नेमके कारण काय होते, हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या अपघातामुळे कात्रज घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *