![]()
पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्रजी खूप अभ्यासू आहेत, पेपर संपले तरी त्यांचा अभ्यास सुरु आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी पंचनाम्यांच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. आता त्यांनी पंचनाम्यांचा खटाटोप सुरु केला आहे. प्रत्यक्षामध्ये सर्वच ठिकाणी पीके सुकलेली आहेत. नुकसान झालेले आहे असं असताना पंचनामे कशासाठी? असा सवाल सपकाळ यांनी केला. राज्यात कोकणापासून चांद्यापासून बांद्यापर्यंत हीच परिस्थिती असल्याचेही ते म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे सरकारला कुठेही पाझर फुटत नाही. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी स्थिती आहे. दुष्काळ जाहीर करून टाकला मात्र मदतीचा अजून पत्ता नाही. थोतांडबाजी बंद करा, पंचनाम्याचे नाटक बंद करा, ही दिशाभूल बंद करा. दसऱ्याच्या आधी एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. त्यामुळे सरसकट पूर्णपणे कर्जमाफी करा. मनमोहन सिंग यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला होता, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील संपूर्ण कर्जमाफी करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक सुरु पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, शेतमजुरांना देखील सानुग्रह अनुदानाचा विचार करा, रेशन धान्य दुकानदारांना दुपटीने धान्य उपलब्ध करून द्या. चारा छावण्या तातडीने सुरू करा, मुलांची ट्यूशन फी, बस पास मोफत द्यावी अशा मागण्या आहेत. जलमिशन अंतर्गत अनेक योजना बंद पडल्या आहेत. जलजीवन मिशन नव्हे तर जलमरण मिशन योजना आहे, सर्व योजना सुरू झाल्या पाहिजेत. केंद्रीय पथक येणं आणि पंचनामे करणे हा पांचट धंदा सध्या चालला आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. केवळ आठ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. फडवणीस यांना फसवणीस म्हणण्याची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका सपकाळ यांनी केली आहे. कुंभमेळ्यामध्ये भ्रष्टाचार सुरू कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. कुंभमेळा मध्ये मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. सीसीटीव्ही असेल किंवा इतर गोष्टी या ठिकाणी पैसे खाण्याची जी तरतूद असेल तिला मर्यादा लावावी आणि हा पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा. 78000 कोटी रुपये शक्तीपीठात टाकण्याऐवजी शेतकऱ्यांना मदतीच्या स्वरूपात शक्ती द्या, असे सपकाळ म्हणाले. तसेच, कुंभमेळ्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, शक्तिपीठ महामार्ग मध्ये भ्रष्टाचार सुरू आहे जाऊ तिथे खाऊ अशी सरकारची भूमिका आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही सरकारला वाटाण्याच्या अक्षदा लावत असाल तर हे योग्य नाही. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे करणार आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Source link
‘फडणवीस यांना फसवणीस म्हणण्याची वेळ आली’:‘पंचनाम्याचे नाटक बंद करा, दसऱ्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करा' – हर्षवर्धन सपकाळ