![]()
सध्या विविध आंदोलनांनी राजकारण ढवळून निघालेले असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आणि आक्रमक उत्तर भारतीय चेहरा म्हणून ओळखले जाणारे नेते आनंद दुबे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पक्षासाठी तन-मन-धनाने काम केले, तिथे आता डास, माश्या, पाली आणि झुरळांसारख्या उपद्रवी घटकांनी कब्जा केला आहे. शर्जील इमाम, उमर खालिद किंवा ध्रुव राठीसारखे लोक माझे नेते कधीच होऊ शकत नाहीत. सनातन धर्माचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मी मरण पत्करेन,” अशी अत्यंत संतप्त टीका आनंद दुबे यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना केला. छत्रपती माझे दैवत, सावरकरांना शिव्या देणाऱ्यांशी जुळवून घेणे अशक्य! आपल्या राजीनाम्याची सविस्तर पार्श्वभूमी सांगताना आनंद दुबे म्हणाले, “मी अत्यंत दुःखी मनाने हा निर्णय घेतला आहे. 2024ची लोकसभा असो, 2024ची विधानसभा असो किंवा 2026ची मुंबई महानगरपालिका निवडणूक असो; पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी स्टार प्रचारक म्हणून आणि टीव्ही डिबेट्सच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पक्षाची जी दिशा आणि भूमिका झाली आहे, तिच्याशी मी स्वतःला जुळवून घेऊ शकत नाही.” “माझे नेते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आदर्श व दैवत मानणारा कार्यकर्ता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर माझे हिरो आहेत; मात्र आघाडीतील घटक पक्ष उघडपणे सावरकरांना शिव्यांची लाखोली वाहतात. काही लोक सनातन धर्माची तुलना ‘डेंग्यू’शी करतात, तर काही प्रभू श्रीराम आणि भगवान शंकरामध्ये भेदभाव निर्माण करतात. अशा विकृत आणि अराजक वातावरणात मी गप्प राहू शकत नाही.” कॅप्टन स्मित मच्छार यांच्या सन्मानार्थ साधे एक ट्विटही केले नाही! देशभक्तीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी खंत व्यक्त केली. “आपल्या देशासाठी असीम शौर्य गाजवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी किंवा त्यांच्या समर्थनार्थ आमच्या विरोधी पक्षांच्या आघाडीने साधे एक ट्विटही केले नाही. अशा वेळी माझ्यासारख्या देशभक्त कार्यकर्त्याचे मन जळणार नाही का? देश, सनातन धर्म आणि हिंदुत्वाच्या विरोधात जाऊन राजकारण करण्यापेक्षा मी मरण पसंत करेन.” एकतर्फी प्रेम जास्त काळ टिकत नाही “कवीच्या भाषेत सांगायचे तर—’जो भरा नहीं है भावों से, जिसमें बहती रसधार नहीं, वह हृदय नहीं वह पत्थर है, जिसमें स्वदेश से प्यार नहीं!’ जिथे मनाचा मेळ बसत नाही, तिथून आनंदाने बाहेर पडलेलेच बरे. एकतर्फी प्रेम फार काळ चालू शकत नाही.” मतचोरीचा कांगावा, प्रत्यक्षात काही लोकांची डोकीच चोरीला गेलीत! निवडणूक आयोगावर आणि ‘व्होट चोरी’च्या आरोपांवरून सुरू असलेल्या आंदोलनांचा समाचार घेताना दुबे म्हणाले, “आज लोकशाही धोक्यात आल्याचे आणि मते चोरीला गेल्याचे खोटे नरेटिव्ह चालवले जात आहे. उत्तर प्रदेशात 40 वर्षांपासून काँग्रेस सत्तेत नाही, बिहारमध्ये 40 वर्षांपासून नाही, गुजरातमध्ये 30-32 वर्षे भाजप आहे, पश्चिम बंगालमध्ये 50 वर्षांपासून काँग्रेस नाही आणि राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सरकार बदलते; मग तिथे कसली मतचोरी झाली? देशात मतचोरी झालेली नसून काही पराभूत मानसिकतेच्या लोकांची डोकीच चोरीला गेली आहेत. आता यासाठी चांगल्या डॉक्टरकडून मेंदूवर उपचार करून घेण्याचीच गरज आहे.” डब्यात कॉकरोच शिरलेत, आता चांगला डबा शोधणार पक्षांतर्गत कटकारस्थानांवर बोट ठेवत आगामी राजकीय भूमिकेबाबत आनंद दुबे यांनी स्पष्ट संकेत दिले. “काही दिवसांपूर्वी एआय (AI) आणि बनावट तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या हकालपट्टीचे खोटे पत्र व्हायरल करण्यात आले होते. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पक्षाने माझ्या बाजूने एक शब्दही काढला नाही. मीच न्यायाधीश आणि मीच गुन्हेगार अशी पक्षाची अवस्था झाली होती, ज्यामुळे मला प्रचंड वेदना झाल्या.” चांगल्या पर्यायाचा शोध “ज्या डब्यात मी प्रवास करत होतो, तिथे आता घाण पसरवणारे कॉकरोच (झुरळं) घुसले आहेत. राजकारणात नेता पक्षाशिवाय अपूर्ण असतो, त्यामुळे येत्या काळात विचार करून निश्चितपणे चांगल्या डब्यात (पक्षात) प्रवेश करेन,” असे सांगत त्यांनी अन्य पक्षात जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उत्तर भारतीय चेहरा आणि पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे प्रवक्ते आनंद दुबे यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसला असून, त्यांच्या या स्फोटक विधानांमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. ———————————————— हेही वाचा… राहुल गांधींची टोकाची अतिरेकी भूमिका देशात अराजकता माजवण्यासाठीच!: भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा परदेशी फंडिंगचाही थेट आरोप
“हातात संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधी आणि विरोधकांकडून आज प्रत्यक्षात संविधानाचा आणि लोकशाहीचा पद्धतशीरपणे गळा घोटण्याचे काम सुरू आहे. आधी शिक्षण व्यवस्था आणि धर्मेंद्र प्रधानांवर निशाणा साधला, मग मतदार यादी शुद्धीकरणाच्या ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेला विरोध करत मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा मागितला; त्यानंतर एमपीएससीच्या माध्यमातून भावी अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि आता थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चे काढून सरन्यायाधीशांवर चाल करून जाण्याची भाषा सुरू आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
आनंद दुबे यांचा शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र!:म्हणाले- शर्जील इमाम, उमर खालिद अन् ध्रुव राठी माझे नेते होऊ शकत नाहीत; ज्या डब्यात कॉकरोच शिरले तो डबा सोडला!