![]()
परिवर्तनाच्या चळवळीत महा त्मा ज्योतिराव फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मोलाचे आहे. या महापुरुषांच्या लोककल्याणाची वारी पुढे नेण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती व चवदारतळे सत्याग्रह स्मृतिशताब्दी निमित्त विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांचा क्रांतिज्योती स्मृती पुरस्काराने सोमवारी (दि. १२) गौरव करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. नाना पेठेतील डी. सी. एस. सोसायटीच्या ज्योतिराव फुले हायस्कूलमधील ‘अहिल्याश्रम’ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर परशुराम वाडेकर, संयोजक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू मंचावर होते. डी. सी. एस. सोसायटीचे अध्यक्ष विशाल शेवाळे अध्यक्षस्थानी होते. शाल, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, समाजाची संस्कृती सत्यावर अवलंबून असते. संतांनी, महापुरुषांनी समाजाला सत्याची शिकवण दिली आहे. भविष्यातही ही सत्याची पूजा सुरू राहिली पाहिजे. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महापुरुषांच्या स्पर्शाने पावन झालेल्या अहिल्याश्रम या वास्तूत गौरव होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. महापुरुषांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. ॲड. प्रमोद आडकर यांनी डी. सी. एस. सोसायटीशी असलेल्या कौटुंबिक संबंधांना उजाळा देत पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शोषित, पिडितांच्या अडचणी समजून घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षा परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली. महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले.
Source link
डॉ. नीलम गोऱ्हे, ॲड. प्रमोद आडकर यांना क्रांतिज्योती स्मृती पुरस्कार:डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले- लोककल्याणाची वारी पुढे नेण्यासाठी अनुयायांनी एकत्र यावे