![]()
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला. ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या मेळाव्याला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्यावर टीका करत कार्यकर्त्यांना ताकदीने निवडणूक लढण्याचे आवाहन केले. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही चव्हाण यांच्यावर आरोप करत दिलीप घुगे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. मेळाव्यात बोलताना अंबादास दानवे यांनी निवडणुकीच्या रणनीतीवर भाष्य केले. ते म्हणाले, भाषण करून जिंकायची ही निवडणूक नाही. आपल्या जिल्ह्यात 91 हजार मतदार आहेत, 217 आपल्याकडे बूथ आहेत. आपण नोंदणी नाही केली तरी या शहरात 25 हजार ते 30 हजार मतदार आपले आहेत. आपण सुद्धा संघटनेच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. आपण संघटना म्हणून निवडणूक लढतोय. प्रचार करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे ही मॅच काय टेस्ट नाही. आपल्या ट्वेंटी-ट्वेंटी खेळायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यात उमेदवार दिल्यामुळे आपण पुण्यात उमेदवार दिला, असेही अंबादास दानवे त्यांनी सांगितले. अमरावती शिक्षक आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा आपल्याला सुटली होती. मात्र शरद पवार यांच्या पक्षाने उमेदवार दिल्यामुळे आपणही कोल्हापूरच्या सुनील मोदी यांना उमेदवारी दिल्याचे दानवे म्हणाले. ‘सतीश चव्हाण यांची मस्ती जिरवावी लागणार’ सतीश चव्हाण यांच्यावर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले, समोर जो उमेदवार उभा आहे, त्याने आपल्याला खूप त्रास दिला आहे. सतीश चव्हाण यांनी गंगापूरच्या शिवसेनेला खूप त्रास दिला आहे. प्रशांत बंबने सुद्धा कधी त्रास दिला नाही, गंगापूरमध्ये आपले लोक फोडले. सतीश चव्हाणची मस्ती जिरवावी लागणार आहे. जिथं उजडेल तिथं उजडेल, आपण ताकतीने लढू. या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि ताकदीने प्रचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. चंद्रकांत खैरेंचा सतीश चव्हाणांवर निशाणा मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनीही सतीश चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आपला उमेदवार काय लहान नाही. मनोज जरांगे एका दिवसात मोठा झाला. दिपके एका रात्रीत मोठा झाला. आपला सुद्धा दिलीप घुगे मोठा होईल. आपला उमेदवार शंभर टक्के निवडून येणार मध्येचं तुतारीवाला घुसला. मागच्या वेळेस तीन वेळा निवडून आलेला उमेदवार कोणी निवडून आणलं, मागच्या वेळेस हाता पाया पडला माझ्या. माझ्या निवडणुकीला सतीश चव्हाण यांनी भुमरेचं काम केलं, आता त्याला नाही साफ केलं तर नाव बदलून ठेवा माझं. यावेळी त्यांनी सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी आपण मदत केल्याचा दावाही केला. माझे फोन घेतले नाही, तर पदवीधरांचे फोन कधी घेईल चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील नोकरभरतीवरूनही सतीश चव्हाण यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ मुळे अण्णांनी उभी केली, नोकर भरतीसाठी 1 कोटी, 25 ते 50 लाख रुपये घेतो हा भ्रष्टाचार नाही का. आमदार सतीश चव्हाण यांच्यावर आरोप केला. संभाजीनगरच्या 91 हजार मतदारांना मी स्वतः फोन करून सांगेल. आपला खरखोर विजय होणार. तर सतीश चव्हाण पडणार आहे, तो फक्त फोनमुळे पडणार आहे. माझे फोन घेतले नाही. मी त्याला निवडून आणलं. माझे फोन घेतले नाही, तर पदवीधरांचे फोन कधी घेईल. या आरोपांमुळे निवडणुकीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून आमदार सतीश चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून दिलीप घुगे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतापसिंह पाटील निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीतील या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होत असली, तरी सतीश चव्हाण यांच्याविरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Source link
'सतीश चव्हाण यांची मस्ती जिरवावी लागणार':अंबादास दानवेंची टीका; चंद्रकांत खैरेंनीही साधला चव्हाणांवर निशाणा