Headlines

आमदारकीच्या 6 जागांसाठी भाजपची 30 नावे:माधवी नाईक, उपाध्ये, मुळीक, केणेकर, चाकूरकर शर्यतीत; प्रज्ञा सातव यांची जागा पक्की?




विधान परिषदेच्या 6 जागांसाठी भाजपने 30 संभाव्य उमेदवारांची नावे दिल्लीला पाठवली आहेत. यापैकी एका जागेवर माजी आमदार प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. उर्वरित 5 जागांसाठी केशव उपाध्ये, माधवी नाईक, उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक यांच्यात कडवी स्पर्धा आहे. यातून योग्य उमेदवारांची निवड करताना भाजपला कडक नियमांची चाळणी लावावी लागणार आहे. राज्यात येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात विधानसभेतील संख्याबळानुसार, भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 6 जागा येणार आहेत. तर सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाट्याला अनुक्रमे 2 व 1 जागा येणार आहे. निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. त्यामुळे महायुतीचे 8 आमदार सहज निवडून येतील असे चित्र आहे. याऊलट विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ 1 उमेदवार निवडून येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीने आपल्या वाट्याला येणाऱ्या 6 जागांसाठी जवळपास 30 जणांची नावे अंतिम मंजुरीसाठी दिल्ली स्थित पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत. दिल्लीला पाठवलेल्या यादीत कुणाची नावे? सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने दिल्लीला पाठवलेल्या यादीत माधवी नाईक, उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूकर, दादाराव केचे, संजय भेंडे आदींची नावे आहेत. भाजपने इच्छुकांची लांबलचक यादी पाहता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना विधानपरिषदेवर संधी द्यायची नाही असे धोरण स्वीकारले आहे. पक्षाने या प्रकरणी संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना व जातीय समीकरणे साधणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे संकेत दिलेत. जे लोक जनतेतून निवडून येत नाहीत त्यांचे मागच्या दाराने राजकीय पुनर्वसन करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने खासगीत बोलताना व्यक्त केले आहे. त्यामुळे इच्छुक 30 जणांच्या यादीतून आपसूकच अनेक नावे कापली जाणार आहेत. प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित माजी आमदार प्रज्ञा सातव यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपच्या वाट्याच्या 6 पैकी 1 जागा सातव यांना देण्यात येईल हे स्पष्ट आहे. त्यामुळे उर्वरित 5 जागांसाठी पक्षातील नेत्यांत जोरदार शर्यत लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या जागांवर कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पुढील आठवड्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाईल. यात भाजपकडून धक्कातंत्र राबवले जाण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *