![]()
उद्योजकांना व्यवसायविस्ताराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अग्रवाल समाज पुणे यांच्या वतीने ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’ या व्यवसाय प्रदर्शनाचे आयोजन १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान डेक्कन कॉलेज मैदानावर करण्यात आले आहे. ‘सोच से सफलता तक’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनात विविध उद्योगांतील उद्योजक, व्यावसायिक आणि तज्ज्ञ सहभागी होणार असून, व्यवसायवृद्धी, व्यावसायिक संपर्क आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांवर भर दिला जाणार आहे. अग्रवाल समाज पुणेचे अध्यक्ष ईश्वरचंद गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी संस्थेचे सचिव संजय अग्रवाल, कोषाध्यक्ष दीपक बंसल आणि सहसचिव मुकेश कनोडिया उपस्थित होते. प्रदर्शनात विविध कंपन्या आणि उद्योजकांची उत्पादने व सेवांचे प्रदर्शन होणार आहे. तसेच व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे आणि व्यावसायिक संपर्कवाढीसाठी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सर्व समाजांतील नागरिकांना प्रदर्शनात विनामूल्य प्रवेश असेल. १६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. पहिल्या दिवशी नेतृत्वाचा वारसा, महिला नेतृत्व आणि व्यवसायवृद्धी या विषयांवरील सत्रांसह दांडिया नाइटचे आयोजन करण्यात आले आहे. १७ ऑक्टोबर रोजी ‘महासंगम समिट’, ब्रँडनिर्मिती व नफावाढीवरील व्याख्यान, ‘व्हिजनरी लीडर्स’ चर्चासत्र आणि ‘आरोग्य संवाद : हेल्थ फर्स्ट’ हा आरोग्यविषयक कार्यक्रम होणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी युवकांसाठी उपक्रम, करिअर समुपदेशन, पुरस्कार वितरण आणि अग्रसेन जयंती उत्सव आयोजित केला आहे. क्विक हील टेक्नॉलॉजीजचे संस्थापक कैलाश काटकर, डायनॅमिक इंडिया ग्रुपचे संस्थापक सोनू शर्मा आणि शेल्स अॅडव्हर्टायझिंगचे संस्थापक डॉ. संजय अरोरा यांच्यासह निलॉन्स एंटरप्रायझेस, चितळे बंधू आणि रांका ज्वेलर्सचे प्रतिनिधीही या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. उद्योजकता, नेतृत्वगुण आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देत व्यावसायिकांसाठी नवे व्यासपीठ निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Source link
पुण्यात 16ऑक्टोबरपासून ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो’:उद्योजकांना व्यवसायवृद्धी, नेटवर्किंगची संधी; उद्योग, नेतृत्व आणि आरोग्यावर सत्रे