![]()
राज्यात सध्या जिल्हा बँक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा धक्का बसला आहे. जत सोसायटी गटातून भरलेला त्यांचा उमेदवारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पडळकर यांना आता या निवडणुकीत उभे राहता येणार नाही. सांगली जिल्हा बँक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला होता. या निर्णयाला विरोध करत माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय फिरवत पडळकरांचा अर्ज बाद ठरवला आहे. फौजदारी कारवाईची मागणी कोल्हापूर खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत अर्ज बाद झाल्यानंतर विरोधकांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांना ज्यांनी ज्यांनी खोटे कागदपत्रे उपलब्ध करून दिले, त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे. उमेदवारीवर आक्षेप का? याचिकाकर्त्यांनी पडळकर यांच्या कुणीकोणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीतील सभासदत्वाला आणि निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील संचालकपदाच्या अनुभवाला आक्षेप घेतला होता. नियमानुसार उमेदवाराला किमान दोन वर्षांचे सभासदत्व व व्यवस्थापक समितीवर एक वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक असतो. पडळकरांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी कुणीकोणूर येथे जमीन खरेदी केली, मग त्यापूर्वीच त्यांना सभासदत्व कसे मिळाले, असा कायदेशीर मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला होता. शक्तीप्रदर्शन आणि घोषणाबाजी तत्पूर्वी, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सांगली जिल्हा बँकेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज भरतेवेळी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोठा गदारोळ झाला. तसेच, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजकीय संघर्षाला पूर्णविराम दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली होती. मात्र पडळकरांच्या एन्ट्रीमुळे आणि त्यांच्या आक्रमक शक्तीप्रदर्शनामुळे या निवडणुकीत थेट जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असा तीव्र संघर्ष पाहायला मिळणार, अशी चिन्हे होती. आता मात्र, न्यायालयाच्या निकालामुळे पडळकर या निवडणूक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
Source link
आमदार गोपीचंद पडळकरांना उच्च न्यायालयाचा दणका!:जिल्हा बँक उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने पडळकर निवडणुकीच्या रिंगणाबाहेर