![]()
पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मुलगी एकटी असल्याची संधी साधून मेट्रोच्या पिलर उभारणीच्या कामावर कार्यरत असलेल्या एका कामगाराने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, पवित्र मंदिरातही मुली सुरक्षित नसतील, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, असा सवाल उपस्थित केला. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी गृहखाते आणि पोलिस प्रशासनावरही टीका केली. संबंधित आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘मंदिरातही मुली सुरक्षित नसतील, तर कायदा-सुव्यवस्था आहे कुठे?’ निगडीतील घटनेवर संताप व्यक्त करत वडेट्टीवार यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्य सरकारला धारेवर धरले. महिलांच्या सुरक्षेबाबत आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात गुन्हेगारांवर पुरेसा वचक राहिला आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक ठिकाणांपासून धार्मिक स्थळांपर्यंत महिलांच्या सुरक्षेची खात्री असणे आवश्यक आहे. मात्र, मंदिरासारख्या पवित्र ठिकाणीही अशा प्रकारची घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून अधोरेखित केले. महिला सुरक्षेच्या बाबतीत गृहखाते आणि पोलिस प्रशासन वारंवार अपयशी ठरत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण होणारी भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. निगडीतील मंदिरात नेमकं काय घडलं? निगडी परिसरातील एका मंदिरात अल्पवयीन मुलगी दर्शनासाठी गेली होती. तिने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ती काही वेळ गाभाऱ्याच्या कोपऱ्यात थांबली होती. त्याचवेळी मेट्रोच्या पिलर उभारणीच्या कामावर कार्यरत असलेला एक कामगार गाभाऱ्यात आला. त्या ठिकाणी मुलगी एकटी असल्याची संधी साधून त्याने तिला कोपऱ्यात ओढत तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्ये महत्त्वाची ठरली आहेत. फुटेजमध्ये घडलेल्या प्रकाराचे चित्रण झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित कामगाराला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलिसांकडून केला जात आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अशा घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने तपास करून पुरावे गोळा करावेत आणि कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. भविष्यात महिलांकडे किंवा मुलींकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस कोणी करू नये, असा धाक निर्माण करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, मंदिरासारख्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याकडेही या घटनेमुळे लक्ष वेधले गेले आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिस तपासातील निष्कर्ष आणि पुढील कायदेशीर कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. हेही वाचा…. प्रकृती बरी नसतानाही सुट्टी नाकारल्याचा आरोप:14 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, आदिवासी मंत्री अशोक उईकेंची आश्रमशाळेला भेट गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीचा वसतिगृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 12) सायंकाळी उघडकीस आली. राणू कृष्णा हलामी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रकृती बरी नसल्याने घरी जाण्यासाठी सुट्टी मागितली असतानाही तिला सुट्टी नाकारण्यात आल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. तसेच, तिला खोलीत बंद करून ठेवल्याचाही दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासह पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सविस्तर वाचा…
Source link
मंदिराच्या गाभाऱ्यातही मुली सुरक्षित नाहीत?:निगडीतील घटनेवर विजय वडेट्टीवार संतप्त, गृहखात्यावर साधला निशाणा