Headlines

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार शेळके आणि RTI कार्यकर्त्यात वाद:परस्परविरोधी तक्रारी दाखल, मारहाण आणि माहिती पुरवल्याचे आरोप




पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके आणि माहिती अधिकार कार्यकर्ता सुनील रघुनाथ गुजर यांच्यात गुरुवारी (१६ ऑक्टोबर) दुपारी वाद झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. तक्रारींची सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील गुजर हे मावळ तालुक्यातील पिंपळोळी येथील रहिवासी असून माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ते माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांचा आमदार सुनील शेळके यांच्याशी शाब्दिक वाद झाला. या वादादरम्यान आमदारांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली, आपली बॅग तपासली तसेच हाताने मारहाण केल्याचा आरोप गुजर यांनी लेखी तक्रारीत केला आहे. दुसरीकडे, आमदार सुनील शेळके यांनीही गुजर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. गुजर हे आपल्यासंबंधीची माहिती राजकीय विरोधकांना पुरवत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात काही काळ वादाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने नेमका वाद कशामुळे झाला, तसेच मारहाण आणि माहिती पुरवण्याच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. तक्रारींची चौकशी करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *