![]()
हिंगोली जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम जन्मदात्या वडिलांना हिंगोली जिल्हा न्यायालयाने नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजन्म सश्रम कारावास आणि १ लाख २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हिंगोलीच्या जिल्हा न्यायाधीश एस. एन. माने-गाडेकर यांनी शनिवारी ता १७ हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, न्यायालयाने पिडीत मुलीला मनोधैर्य योजने अंतर्गत ५ लाखांची आर्थिक मदत देण्याचेही निर्देश शासनाला दिले आहेत. या बाबत सरकारी वकिल ॲड एन.एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहिती नुसार, हिंगोली जिल्ह्यातील एका पीडित अल्पवयीन मुलीने २९ एप्रिल २०२३ रोजी तक्रार दिली. फिर्यादीनुसार, ता १८ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल २०२३ दरम्यान तिच्या वडिलांनी तिला गुलाबजामुन, भेळ आणि कलाकंदमध्ये गुंगीचे औषध दिले. त्यामुळे तिला गुंगी आल्यावर आणि ती अर्धवट झोपेत असताना आरोपी वडिलांनी तिच्यासोबत छेडछाड केली. त्यानंतर २२ एप्रिल २०२३ रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीचे दोन्ही हात ओढणीने बांधून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिला चापट-बुक्यांनी मारहाणही केली होती. पीडितेच्या तक्रारीवरून संबंधित पोलीस ठाण्यात आरोपी पित्या विरुद्ध विविध कलमांसह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक श्रीमती श्रीदेवी वग्गे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एन. माने गाडेकर यांच्या न्यायाल्यात सुनावणी साठी आले होते. प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीत मुलीची साक्ष महत्वाची ठरली.न्यायालयातील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी पित्याला ‘नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत आजन्म सश्रम कारावास’ व एकूण १ लाख दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय न्यायालयाने पीडित अल्पवयीन मुलीला शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत ५ लाख रुपये आर्थिक मदत म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक सरकारी वकील एस. डी. कुटे, सविता एस. देशमुख, आणि कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार प्रमोद मार्कड यांनी सहकार्य केले.
Source link
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार:आरोपी जन्मदात्या वडिलांना नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजन्म कारावास, हिंगोली न्यायालयाचा निर्णय