Headlines

पुण्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू!:येरवडा परिसरातील दुर्दैवी घटना; सुरक्षेच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संताप




पुण्यात ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साधारण तीन महिन्यांपूर्वी मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्यानंतर महापालिकेने कंत्राटदारावर कारवाई केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती आता पुण्याच्या येरवडा परिसरात पाहायला मिळाली असून, कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षितता नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. येरवडा येथील मच्छी मार्केट भागात 17 ऑक्टोबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. प्रदीप परदेशी (वय 55) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. रस्त्यावरून जात असताना एका रिक्षाचा धक्का लागल्याने ते थेट ड्रेनेजसाठी खोदलेल्या 10 ते 15 फूट खोल खड्ड्यात कोसळले. खड्ड्यात पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या खड्ड्याभोवती सुरक्षेसाठी कोणतीही योग्य उपाययोजना करण्यात आली नव्हती, तसेच या परिसरात यापूर्वीही असे अपघात झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नातेवाईकांची पोलिसांत धाव या धक्कादायक घटनेनंतर प्रदीप परदेशी यांच्या संतप्त नातेवाईकांनी तात्काळ लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. ड्रेनेजसारखी कामे सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी साध्या उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत आणि या निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. पोलिसांचा तपास सुरू सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. मुंबईतील घटनेनंतर जशी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, तशीच कठोर कारवाई या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. वाढत्या अपघातांमुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. दुर्घटना:मुंबईत मॅनहोलमध्ये पडल्याने वृद्धाचा मृत्यू, उघड्या मॅनहोलप्रकरणी मुंबई मनपाच्या 4 अधिकाऱ्यांचे निलंबन मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला गुरुवारी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यातील हा पावसाचा प्रभाव आगामी ७ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. दरम्यान, मुंबईत गुरुवारी सकाळपर्यंत २४ तासांत ९ इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली. साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी बृहन्मुंबई महापालिकेने संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर झाली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *