![]()
स्त्री ही केवळ त्यागमूर्ती नसून शक्ती, संघर्ष आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे. स्त्रीला केवळ आदर्शाच्या चौकटीत अडकवू नका. तिने आधीच मोठ्या प्रमाणात त्याग केला आहे. देवीने महिषासुर, चंड-मुंड यांसारख्या राक्षसांचा संहार केला, त्याचप्रमाणे आजची स्त्रीदेखील समाजातील अन्याय, विषमता आणि नकारात्मक शक्तींविरुद्ध समर्थपणे लढा देत आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले. श्री भवानी माताजी जैन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री चामुंडा भवानी माताजी मंदिर, भिलारेवाडी, कात्रज येथे ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ व ‘आदर्श माता पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात झाला. पुरस्कारांचे वितरण माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मिसाळ बोलत होत्या. आदर्श माता पुरस्काराने सुशीला मुथा व मंगला नाहार यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विमल बाफना, विद्या नाईकनवरे, एकता भन्साळी, डॉ. नीता मुंशी, प्रेरणा नाहार, ज्योती नाहार, भारती विजयजी भंडारी, नवीना पोरवाल व अनिता ओसवाल यांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल नवदुर्गा सन्मान २०२६ प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात श्री भवानी माताजी जैन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेश पी. नाहार यांचाही विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणे व नागौर येथे भव्य भवानी माताजी मंदिरांच्या उभारणीत त्यांचे दूरदृष्टीपूर्ण व यशस्वी नेतृत्व, मंदिरांच्या विकासासाठी तन-मन-धनाने केलेले योगदान, तसेच धार्मिक, सामाजिक व सेवाभावी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष राजेश नाहार यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव, मातृशक्तीचा सन्मान आणि समाजातील प्रेरणादायी महिलांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. माधुरी मिसाळ पुढे म्हणाल्या की, महिलांनी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. समाजाने महिलांकडून केवळ त्यागाची अपेक्षा न ठेवता त्यांना सन्मान, समान संधी आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.
Source link
श्री भवानी माताजी ट्रस्टतर्फे नवदुर्गा, आदर्श माता पुरस्कारांचे वितरण:माधुरी मिसाळ म्हणाल्या, महिलांचा नकारात्मक शक्तींविरुद्ध लढा आजही सुरूच