![]()
दांडिया कार्यक्रमानंतर झालेल्या वादातून मारहाणीच्या घटना बाणेर आणि धनकवडी भागात घडल्या. या प्रकरणी पोलिसांनी सहकारनगर आणि बाणेर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. धनकवडीतील श्रीधरनगर भागात एका सोसायटीच्या आवारात तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. याबाबत अनिकेत मोरेश्वर तावरे (वय ३१, रा. श्रीनगर पार्वती हाईट्स, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी प्रकाश कोकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोसायटीतील दांडिया कार्यक्रमानंतर रात्री दहाच्या सुमारास मित्रांबरोबर गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी हा दारू पिऊन सोसायटीत आला. त्याने सोसायटीच्या आवारात शिवीगाळ केली. तक्रारदार तरुणाला गजाने मारहाण केली, तसेच सिमेंटचा गट्टू फेकून मारला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. बालेवाडीतील साई चौकात एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत सुमीत राजू राठोड (वय २०, रा. पाटीलनगर, बालेवाडी) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी किरण सोनवणे याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री राठोड आणि त्यांची बहीण बालेवाडीतील साई चौकात दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. त्या वेळी आरोपींनी जुन्या वादातून राठोड याला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातला. पोलीस हवालदार एस सकट तपास करत आहेत. मांजरीत घरफोडी; सात लाखांचा ऐवज चोरला घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरीतील झगडे वस्ती परिसरात तक्रारदार यांचे बैठे घर आहे. १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडले. कपाटातील सात लाख दहा हजार रुपयांचे दागिने चोरुन चोरटे पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करत आहेत.
Source link
दांडिया कार्यक्रमानंतर पुण्यात मारहाणीच्या दोन घटना:बाणेर आणि धनकवडीत तरुणांना मारहाण, दोन गुन्हे दाखल