![]()
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात मोठी कारवाई करत कर्नाटकातून आणलेला पनीर आणि खव्याचा एकूण १० हजार ८८८ किलो साठा जप्त केला. बावधन, बिबवेवाडी आणि कसबा पेठ परिसरात केलेल्या या कारवाईतील साठ्याची किंमत ३१ लाख ६ हजार ६८० रुपये आहे. अस्वच्छ परिस्थितीतील वाहतूक, साठवणूक आणि विनासील विक्रीमुळे हे पदार्थ मानवी सेवनासाठी असुरक्षित असल्याच्या संशयावरून जप्त करून नष्ट करण्यात आले. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत सोमवारी सकाळी सहापासून पथकांनी तपासणी सुरू केली. कर्नाटकातून पुण्यात पनीर आणि खवा वाहून आणणाऱ्या वाहनांवर विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. बावधन येथे एका वाहनातून १० लाख ५६ हजार रुपयांचा, कसबा पेठेत दुसऱ्या वाहनातून ८ लाख ३ हजार २२० रुपयांचा, तर बिबवेवाडी येथे तिसऱ्या वाहनातून १० लाख ३१ हजार ४६० रुपयांचा पनीरचा साठा आढळला. याशिवाय कसबा पेठेतील डेंगळे पुलाजवळील शिवशंकर डेअरी येथे ७२० किलो खवा सापडला. त्याची किंमत २ लाख १६ हजार रुपये आहे. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पदार्थांची अनियंत्रित तापमानात वाहतूक आणि साठवणूक केली जात होती. तसेच लो फॅट आणि मीडियम फॅट पनीर सीलबंद स्वरूपात विकण्याचा नियम असतानाही विनासील व अस्वच्छ वातावरणात खुली विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कार्यवाही सुरू आहे. सहायक आयुक्त नारायण सरकटे यांच्यासह अधिकारी आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त पदार्थ नाशवंत असल्याने आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत संशय असल्याने साठा नष्ट केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सणासुदीत खवा, मावा, मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये इतर वनस्पतीजन्य चरबी किंवा घटकांचा वापर करू नये, असे आवाहन प्रशासनाने व्यावसायिकांना केले आहे. अन्नपदार्थांचा दर्जा किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असल्यास ग्राहकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले. यापुढेही अशा प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
Source link
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई:बावधन, बिबवेवाडी, कसबा पेठेतून 11 टन पनीर, खवा जप्त; 31 लाखांचा साठा नष्ट