Headlines

'शेअर क्रॉपर्स'ने तीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले:'एफपीओ'ना पाच ट्रॅक्टरचे वितरण; अनिल घनवट म्हणाले, शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाने उत्पादन वाढवावे




“सरकारने शेतकऱ्यांच्या थाळीतून ओढून घेणे थांबवायला हवे. तरच शेतकरी सक्षम होईल आणि देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देणे, शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे आणि शेतीमालाला चांगला भाव मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेने प्रयत्न करायला हवेत. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांनी उत्पादन क्षमता वाढवायला हवी,” असे प्रतिपादन शेतकरी नेते अनिल घनवट यांनी केले. पुण्यातील ‘शेअर क्रॉपर्स’च्या वतीने पहिल्या टप्प्यात तीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये ‘स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प’, ‘खेत नायक’ आणि ‘किसान नायक’ या ॲपचे अनिल घनवट यांच्या हस्ते लोकार्पण झाले. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सीमा नारोडे, वृत्ती ग्रुपचे संस्थापक वीरेंद्र जमदाडे, ‘फिनसो’चे संस्थापक दीपक शुक्ला आणि राहुल पाटील, तसेच शेअर क्रॉपर्सचे संस्थापक संजय खत्री, सहसंस्थापिका कृष्णा भट, सुधा ज्योती, दिपिका खत्री आदी उपस्थित होते. अनिल घनवट म्हणाले, “शहरांतील विविध प्रकारच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यातील बहुतांश समस्या या शेतीशी जोडलेल्या आहेत. शेतकरी खूश असेल तर सगळेच आलबेल राहील. कृषीप्रधान देशाचा शेतकरी गरीब राहिला तर देशाचा विकास होणार नाही. शेतकरी सतत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र त्याचे यश हे व्यापारी, निसर्ग, सरकार यांच्या हाती असते. असे होऊ नये आणि शेतकऱ्याचे भवितव्य हे त्याच्या हाती राहावे यादृष्टीने या तंत्रज्ञान प्रणाली उपयुक्त ठरतील. या तंत्रज्ञानामुळे शेतीचा खर्च कमी करणे, कर्ज किंवा विम्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे पीक व्यवस्थापनाबाबत अधिक अचूक निर्णय घेणे शक्य होणार आहे.” सीमा नरोडे म्हणाल्या, “शेतकऱ्यांना आपली माहिती देणे सुरक्षित वाटणे हे यातील आव्हान आहे. मात्र ही प्रणाली पारदर्शकपणे काम करत असून यातून कंपनीचा कोणताच फायदा नाही. उलट यामुळे शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे. विविध गोष्टींचे रेकॉर्ड मेंटेन करण्याबरोबरच शेतीसाठी आवश्यक असणारा खर्च कमी करण्यासाठी, बॅलन्स शीट तयार करण्यासाठी, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तसेच विम्यासाठीही या माहितीचा उपयोग होणार आहे.” विरेंद्र जमदाडे म्हणाले, “शेतकऱ्यांना सतत विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र त्यांचे काम थोड्या प्रमाणात सोपे व्हावे यासाठी शेअर क्रॉपर्सने सामाजिक जाणीवेतून हा प्रयत्न केला आहे. एखादे पीक घेताना त्यावर किती खर्च करायचा याची नेमकी मांडणी शेतकऱ्यांना या करता येणार आहे. तसेच आपण पिकवलेल्या मालाची किंमत आपण ठरवणेही यामुळे सोपे होणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि फायदा करुन घ्यावा.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *