![]()
“गेल्या 3 वर्षांपासून माझ्याविरुद्ध आणि मराठा आरक्षण आंदोलनाविरुद्ध एक अतिशय घाणेरडे आणि नियोजनबद्ध षड्यंत्र रचले जात आहे. गरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळू नये, आंदोलन मोडून पडावे आणि मला बदनाम करता यावे यासाठी कसे डावपेच खेळले गेले, हे आज सबंध महाराष्ट्रासमोर आले आहे. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी हे पुरावे कान उघडे ठेवून ऐकावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी,” असा घणाघाती हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित बहुचर्चित पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपमधील अंतर्गत संभाषणाची एक खळबळजनक ऑडिओ क्लिप जाहीर केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नेते पुढे करून जरांगेंचा प्रभाव कसा कमी करायचा आणि त्यासाठी वैयक्तिक स्तरावर फंड कसा उभारायचा, याचे धक्कादायक संभाषण या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. माझ्या विरोधात षड्यंत्र रचणाऱ्यांची झाक उघडली!; जरांगेंचा तीव्र संताप पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच अत्यंत भावुक आणि आक्रमक होत जरांगे पाटील म्हणाले, “गेल्या 3 वर्षांपासून मी किती छळ आणि मानसिक वेदना सहन करतोय, हे केवळ माझ्या गरिबांच्या लेकरांसाठी आहे. निवडणुकीत, उपोषणात आणि आंदोलनात मला आणि माझ्या सहकाऱ्यांना लक्ष्य केले गेले. मी ना भाजपकडून पैसे घेतले, ना कोणाला दिले; तरीही 500 कोटींचा अपप्रचार करून बदनाम करण्याचा डाव आखला गेला.” महाराष्ट्राला हादरवणारे पुरावे “शिंदे साहेब आणि त्यांच्या नेत्यांनी पुरावे मागितले होते. आज मी माध्यमांच्या साक्षीने हे पुरावे जाहीर करत आहे. गरिबाने समाजासाठी काम करणे या महाराष्ट्रात किती अवघड झाले आहे, याचा बोध यातून प्रत्येकाने घ्यावा.” स्फोटक ऑडिओ क्लिपमधील धक्कादायक संभाषण पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी आपल्या मोबाईलवरून भाजपच्या वर्तुळातील संभाषणाची ऑडिओ क्लिप पत्रकारांसमोर वाजवून दाखवली. यामध्ये एका व्यक्तीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत असून त्यात पुढील रणनीती आखली जात असल्याचे दिसते. “जरांगे भाजपला ‘मराठाद्रोही’ ठरवत आहेत आणि त्याचा प्रभाव समाजात पडतोय. प्रवीण दरेकर किंवा नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांचे बोलणे बाजूला ठेवू; पण शिवेंद्रराजे भोसले यांचा व्हिडिओ केला तसाच मुद्दा पुढे करून खासदार उदयनराजे भोसले किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना (नरेंद्र पाटील) बोलतं केले पाहिजे. भाजपमधील मराठा चेहऱ्यांनी समोर येऊन जरांगेंना उत्तर दिले पाहिजे.” नॅरेटिव्ह मोडून काढण्याची चर्चा “जरांगे शेती, कर्जमाफी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत नॅरेटिव्ह तयार करत आहेत आणि आपण फक्त त्याला उत्तरे देत बसतो. त्यामुळे त्यांना थेट तोंड देण्यापेक्षा त्यांच्याविरोधात वातावरण निर्मिती झाली पाहिजे.” पार्टीचा फंड नसेल तर वैयक्तिक फंड द्या; गाड्यांचा आणि मोर्चाचा खर्च उचला! या ऑडिओ क्लिपमधील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे जरांगे यांच्याविरोधात रसद पुरवण्याचा आणि गट तयार करण्याचा कट, “निरंजन डावखरे जेव्हा आले होते, तेव्हा जरांगेंच्या विरोधातील 2 ते 4 मराठा लोकांशी त्यांचे बोलणे करून दिले आहे. दरेकरांशी एक ग्रुप सोडून दिला आहे. आपण सुचिता आणि पावित्र्य पाळण्याच्या नादात आपले राजकीय नुकसान (डॅमेज) होत आहे.” मोर्चा आणि गाड्यांचा खर्च देण्याचे निर्देश “जर कोणी जरांगेंच्या विरोधात उघडपणे बोलायला तयार असेल, तर त्यांना भेटवावे आणि मोकळे करावे. पार्टीचा फंड वापरायचा नसेल, तर वैयक्तिक लोकांनी स्वतःचा फंड वापरावा. त्यांना प्रपोजल द्यावे, त्यांच्या गाड्यांचा आणि मोर्चाचा खर्च उचलावा. सोशल मीडिया कंटेंट क्रिएशनवर चर्चा करण्यापेक्षा त्यांना सरळ सक्रिय करून जरांगेंचे डॅमेज करण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे,” असा संवाद या क्लिपमध्ये समोर आला आहे. आता शोधा कोण आहेत ते सूत्रधार; जरांगेंचे थेट आव्हान ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना थेट पिंजऱ्यात उभे केले. “आता सांगा, मराठा समाजात फूट पाडणारे कोण आहेत? गरिबांचे मुडदे पाडण्यासाठी स्वतःचा फंड देण्याची भाषा करणारे कोण आहेत? माझ्यावर 500 कोटींचा आरोप करणाऱ्यांना आता या ऑडिओ क्लिपमधील एका एका शब्दाचे उत्तर द्यावे लागेल.” पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा “हे राजकारण कोणत्या थराला गेले आहे, हे यावरून दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संभाषणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या या प्रवृत्तींचा पर्दाफाश करावा,” अशी मागणी त्यांनी केली. या ऑडिओ क्लिपच्या स्फोटानंतर सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारमधील संबंधित नेते काय स्पष्टीकरण देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जरांगे यांची पत्रकार परिषद सतत अपडेट करत आहोत…
Source link
मनोज जरांगेंची पत्रकार परिषद सुरू:ऐकवली स्फोटक ऑडिओ क्लिप- जरांगेंना डॅमेज करण्यासाठी भाजपचे मराठा नेते पुढे करा, वैयक्तिक फंडातून रसद पुरवा!