Headlines

Bawankule On Jarange Patil Maratha Reservation Controversy; Statement Update


“मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या कथित 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपबाबत आणि त्यांना अडकवण्याच्या षड्यंत्राबाबत जर त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील, तर त्यांनी केवळ माध्यमांत बोलण्यापेक्षा पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अ

.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण देण्यासोबतच जमिनीच्या सामायिक सातबाऱ्यावरील दस्तनोंदणीबाबत घेतलेला ऐतिहासिक निर्णय, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे ‘रेझिम चेंज’चे भाकीत आणि संजय राऊत यांच्या विधानांवर सडकून टीका केली.

जरांगेंनी अधिकृत तक्रार करावी, चौकशीत सत्य बाहेर येईल!

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर बोलताना बावनकुळे म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जाहीर सभेत आपली भूमिका मांडली असून कोणाशीही अशा प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर जरांगे पाटलांना असे वाटत असेल की हे आंदोलन बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना अडकवण्यासाठी कट रचला जात आहे, तर त्यांनी रीतसर तक्रार द्यावी. तक्रार कुठल्या पोलीस ठाण्यात किंवा यंत्रणेकडे गेली आहे हे तपासून शासन पुढील कारवाई करेल.”

सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न

“आम्हाला मारून टाकतील, आम्ही कसे जगायचे, अशी वक्तव्ये करून जरांगे केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या बोलण्यावर मला फार भाष्य करायचे नाही, तक्रार आल्यावर चौकशीत काय ते सत्य समोर येईलच.”

सामायिक सातबाऱ्याबाबत ऐतिहासिक निर्णय

राज्यातील जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमधील पारदर्शकतेवर बोलताना महसूलमंत्र्यांनी मोठा प्रशासकीय निर्णय जाहीर केला. “पूर्वी एका सातबाऱ्यावर 4 नावे असली तरी एक व्यक्ती परस्पर जमीन विकून मोकळा व्हायचा. खरेदीदार प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर ताब्यावरून मोठे वाद निर्माण होऊन शेकडो दिवाणी खटले न्यायालयात दाखल व्हायचे. यावर शेतकऱ्यांची आणि जनतेची मागणी लक्षात घेऊन सरकारने आता सामायिक शेतीची अधिकृत मोजणी आणि विभागणी झाल्याशिवाय दस्तनोंदणी (रजिस्ट्रेशन) न करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.”

तुकडेबंदी कायद्याबाबत स्पष्टता

“तुकडेबंदी कायदा रद्द झालेला असला तरी शेतजमिनीसाठी 40 हजार चौरस फूट म्हणजे किमान 1 एकराचा नियम पाळावाच लागेल. त्यापेक्षा कमी तुकडा विकायचा असेल, तर तो भूखंड अधिकृतपणे रहिवासी (रेसिडेन्शियल) करून घेऊनच नियमानुसार विक्री करता येईल.”

राज ठाकरेंचे भाकीत म्हणजे दिवाळीतला फटाका

राज ठाकरे यांनी ‘पुढील 3 ते 4 महिन्यांत देशात सत्तापालट होईल’ असा दावा केला होता, त्याचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, “दिवाळी जवळ आली की फटाके फुटतात, राज ठाकरेंचे वक्तव्य हा देखील असाच एक राजकीय फटाका आहे. कोणीही उठून 4 महिन्यांत सत्ता बदलेल असे म्हणू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार जनतेने मतदान करून नरेंद्र मोदींना केंद्रात आणि महायुतीला राज्यात 5 वर्षांसाठी स्पष्ट कौल दिला आहे. हा काही इटली, फ्रान्स किंवा बांगलादेश नाही; भारताचे संविधान अत्यंत कणखर आहे.”

पार्टी सांभाळता येत नाही, ते देश बदलण्याच्या गप्पा मारतात

“राज ठाकरेंची मनसे असो वा उद्धव ठाकरेंची उबाठा; रोज यांचे नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत, पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे. ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही, ते पंतप्रधान मोदींना हटवण्याच्या बाता मारत आहेत.” राज ठाकरेंनी शेअर केलेल्या ‘फ्रेंडशिप फाइल’ डॉक्युमेंट्रीवर बोलताना ते म्हणाले, “देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी उद्योगपतींच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. काँग्रेसने 65 वर्षे उद्योगपतींशी चर्चा करूनच धोरणे आखली होती. विकास करण्यासाठी उद्योगपतींना विश्वासात घ्यावेच लागते; यात गैर काहीही नाही.”

संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे देशद्रोह

संजय राऊत यांच्या विधानांवर अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेत महसूलमंत्री म्हणाले, “अल्बेनियामध्ये सर्वोच्च न्यायालय जाळल्यानंतर त्यातून धडा घेतला पाहिजे, असे म्हणत संजय राऊत अप्रत्यक्षपणे भारतातील सर्वोच्च न्यायालय पेटवण्याच्या हिंसेचे समर्थन करत आहेत का? अशी विधाने करणे हा निव्वळ देशद्रोह आहे. देशातील घटनात्मक संस्थांवर अविश्वास दाखवून जनतेला भडकवण्याचा हा विकृत प्रयत्न असून संविधानावर निष्ठा असणारा कोणताही नागरिक हे सहन करणार नाही.”

रोहित पवारांची पत्रकार परिषद म्हणजे नौटंकी

आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर केलेल्या सादरीकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “ही सर्व नौटंकी असून दिवसभर जनतेचा वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. जनतेला आता अशा खोट्या प्रेझेंटेशन्समध्ये रस नसून विकास आणि दुष्काळी मदत हवी आहे. विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी 2047 पर्यंत त्यांना देशात कोणताही थारा उरणार नाही.”

सुधाकर कोहळे 30,000 मतांच्या फरकाने विजयी होणार!

निवडणूक प्रचाराचा आढावा घेताना बावनकुळे यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. “नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या 6 जिल्ह्यांत महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी दौरा केला. या मतदारसंघातील 2 लाख 55,000 पदवीधरांना हे ठाऊक आहे की त्यांचे प्रलंबित प्रश्न फक्त सत्ताधारी सरकारच सोडवू शकते. सुधाकर कोहळे यांना विधिमंडळाचा 10 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळाशी त्यांचा थेट संपर्क असल्याने ते पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मार्गी लावतील. त्यामुळे ते तब्बल 30,000 पेक्षा अधिक मतांच्या फरकाने निवडून येतील,” असा ठाम विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

————————————————————-

हेही वाचा…

मनोज जरांगेंकडून गुप्त ऑडिओ क्लिप जाहीर: “जरांगेंना डॅमेज करण्यासाठी मराठ्यांनाच रसद पुरवा, 500 कोटी दिल्याची चर्चा”; शिंदे-फडणवीसांना इशारा

“मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.