मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर उपस्थित केलेल्या कथित 500 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीवरून राज्याचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. गुरुवारी सकाळी 1
.
दुसरीकडे, जरांगेंच्या पत्रकार परिषदेआधीच त्यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी हीच ऑडिओ क्लिप पत्रकारांसमोर ऐकवत, “हा पुरावा आधीच फुटला असून जरांगेंची ही निव्वळ ब्लॅकमेलिंग आणि बनावटगिरी आहे,” असा घणाघाती प्रत्यारोप करत सरकारकडे जरांगेंच्या अटकेची मागणी केली आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय?
सकाळी 11 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या काही मिनिटे आधी व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एका महिलेचा हिंदीतील संभाषण ऐकू येत आहे:
“जरांगे पाटील को ऑलरेडी 500 करोड रुपये श्रीकांत शिंदे के पास से पहुंच चुके हैं… अब जरांगे पाटील विधानसभा चुनाव में हमारे फायदे का रहेगा या नहीं फायदे का रहेगा, इसमें मेरा मत अलग है, कॅल्क्युलेशन अलग है… बाकी आप लोग जो सोचते हैं…”

या संभाषणावरून भाजप किंवा महायुतीतील अंतर्गत राजकीय गणिते आणि विधानसभा निवडणुकीतील नफ्या-तोट्याची चर्चा सुरू असल्याचा भास निर्माण केला जात आहे. मात्र, पलीकडून बोलणारी व्यक्ती कोण आहे आणि ही चर्चा कधी व कोठे झाली, याचा कोणताही संदर्भ अद्याप समोर आलेला नाही.
आता पुरावे शोधा; स्वाभिमानाच्या उंटावरून बोलणाऱ्यांची झाक उघडणार; जरांगेंचा आक्रमक पवित्रा
पत्रकार परिषदेला सामोरे जाण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “समाजाने आपले मत मांडायचे नाही का? राज्यात काय हुकूमशाही आणि गुंडगिरी सुरू आहे का? मराठा समाजाने कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्याचे जोडे उचलण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाची चाड बाळगली पाहिजे. तुम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये राहा; पण समाजाला दुखवू नका. समाजाने ठरवले तर चांगल्या-चांगल्यांचा सुपडा साफ होतो.”
500 कोटींचा पुरावा देणार
“रामदास कदम आणि इतर नेते स्वाभिमानाच्या उंटावर बसून आमच्यावर घणाघात करत होते आणि ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ अशी भाषा वापरत होते. आता मी अधिकृत पुरावा देतोय, मग शोधा कोण कोण आहेत ते! गरिबांवर अन्याय करताना आणि गरिबांची माहिती काढताना तुम्हाला तत्परता सुचते; मग या 500 कोटींच्या षड्यंत्रातील सूत्रधारांनाही आता सरकारने शोधून काढावे. आज प्रेस झाली की दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. 2029 ला जनता कोणाला घरी बसवायचे याचे उत्तर देईलच.”
जुने सहकारी अमोल खुणेंचा स्फोट- जरांगेंचा पुरावा आधीच लीक, हा ब्लॅकमेलिंगचा धंदा!
मनोज जरांगे पत्रकार परिषद घेणार त्यापूर्वीच त्यांचे एकेकाळचे सहकारी अमोल खुणे यांनी थेट माध्यमांसमोर येऊन क्लिपचा भांडाफोड केला. अमोल खुणे यांनी आपल्या मोबाईलवर ही क्लिप ऐकवत दावा केला की, “जरांगे पाटील जो पुरावा म्हणून मोठा बॉम्ब टाकणार आहेत, तो आधीच आमच्या हाती आला आहे. यामध्ये एक महिला विधानसभा निवडणुकीतील नफ्या-तोट्याचे कॅल्क्युलेशन मांडत आहे. ही अर्धवट आणि बनावट कॉल रेकॉर्डिंग पुढे करून नेत्यांची बदनामी करण्याचे कारस्थान रचले गेले आहे.”
खंडणीखोर आणि ब्लॅकमेलर असल्याचा आरोप
“जरांगे पाटलांनी अशी खोटी रेकॉर्डिंग चालवणे आणि खोटे आरोप करणे आता बंद करावे. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठीच हा खटाटोप सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत स्वतः कसे मॅनेज झाले हे जरांगेंनी सांगावे. जरांगे हे निव्वळ ब्लॅकमेलर आणि खंडणीखोर असून, शासनाने तात्काळ त्यांच्या मुसक्या आवळाव्यात,” अशी संतप्त मागणी खुणे यांनी केली. सकाळी 11 च्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेकडे आणि त्यावरून महायुती सरकारकडून येणाऱ्या अधिकृत प्रतिक्रियेकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.
——————————————————–
हेही वाचा…
ज्या विषारी सापाला दूध पाजले, तोच आता शिंदेंना दंश मारतोय!:500 कोटींच्या वाटपावरून जरांगे-शिंदेंची नार्को टेस्ट, ईडी चौकशी करा – नवनाथ वाघमारे

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या ताटात माती कालवून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील नावाच्या ज्या विषारी कोब्रा सापाला दूध पाजले, तोच साप आता एकनाथ शिंदेंवर थेट फणा काढून दंश मारण्याचे काम करत आहे. जरांगे हे उपोषणात काजू, मटणाचे सूप पिऊन आणि संडास-बाथरूममध्ये गुपचूप खाऊन निव्वळ नौटंकी करणारे नेते आहेत. भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांमार्फत आलेल्या कथित 500 कोटी रुपयांमधील वाटपावरूनच आता यांच्यात वाद पेटला असून, या संपूर्ण प्रकरणाची ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ निकाल लागण्यासाठी एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे या दोघांचीही नार्को टेस्ट व ईडी (ED) चौकशी झाली पाहिजे,” असा अत्यंत स्फोटक आणि गंभीर आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी