Headlines

Ramdas Kadam Attacks Manoj Jarange Patil Over Old Maratha Reservation Audio Clip


“मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेली ऑडिओ क्लिप ही आजची नसून तब्बल 2 ते 2.5 वर्षांपूर्वीची, म्हणजेच 14 ऑक्टोबर 2024 ची आहे. या काळात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जरांगे

.

मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित संभाषणाची 31 ते 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर, शिवसेना नेते रामदास कदम यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या क्लिपमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या संपूर्ण प्रकरणाच्या लेखी चौकशीची मागणी सरकारकडे जाहीर केली.

14 ऑक्टोबर 2024 ची क्लिप 2 वर्षे का दाबून ठेवली?

जरांगे यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपच्या कालखंडावर बोट ठेवत रामदास कदम म्हणाले, “जरांगे पाटील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत, यात शंका नाही. मात्र, आज त्यांनी दाखवलेली क्लिप ही 14 ऑक्टोबर 2024 ची आहे. 2024, 2025 आणि 2026 अशी 2 ते 2.5 वर्षे ही क्लिप स्वतःजवळ का ठेवली? या काळात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. जर एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी 3 ते 4 लोक कॉन्फरन्स कॉलवर बोलत होते, तर आपल्याच समाजाच्या नेत्याची बदनामी रोखण्यासाठी जरांगेंनी शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते.”

विनोद पाटलांना विचारून घ्या

“मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासाठी सर्व कायदेशीर अभ्यास कोणाच्या बंगल्यावर बसून झाला, हे जरांगेंनी समन्वयक विनोद पाटील यांना विचारून घ्यावे. आम्ही नेहमी पडद्याआडून समाजासाठी काम केले आहे. असे असताना शिंदे साहेबांवर संशय घेणे चुकीचे आहे.”

भाजप आमदाराच्या साक्षीने शिंदेंना ‘चमचे’ म्हणालात; माझ्याकडे पुरावे

मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर राजकीय आरोप करताना कदम यांनी गौप्यस्फोट केला. “माझ्याकडेही एक अत्यंत स्फोटक पुरावा आहे. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या एका गुप्त बैठकीत भाजपचे एक आमदार उपस्थित होते. त्या बैठकीत जरांगे स्वतः म्हणाले की, ‘या बैठकीत निम्मेपेक्षा जास्त एकनाथ शिंदेंचे चमचे बसले आहेत.’ मी हवेत तलवारी चालवणारा नेता नाही, अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. त्या बैठकीत उपस्थित असणारे मराठा समाजाचे इंगळे नावाचे गृहस्थ ताडकन उभे राहिले आणि त्यांनी जरांगेंना ‘हे बोलणे योग्य नाही’ असे तोंडावर सुनावले होते.”

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ?

“भाजपच्या आमदाराला सोबत घेऊन एकनाथ शिंदेंना संपवण्याचे कारस्थान कोण करत आहे? कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ याप्रमाणे एका मराठा नेत्यानेच दुसऱ्या मराठा नेत्याला संपवायची ही सुपारी घेतली आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनाही स्वकीयांशी लढावे लागले होते, तशीच फूट समाजात पाडण्याचे काम जरांगे करत आहेत का?” असा थेट सवाल कदम यांनी विचारला.

ती महिला कोण, पैसे कुठे दिले?; 32 मिनिटांच्या क्लिपची आजच लेखी चौकशी मागणार!

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी करत रामदास कदम म्हणाले, “मी ती संपूर्ण 32 मिनिटांची क्लिप ऐकली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि मुंबईचे काही स्थानिक लोक कॉन्फरन्सवर बोलत आहेत. त्यामध्ये भाजपचा कोणताही वरिष्ठ किंवा मोठा नेता नाही. ती डॉक्टर म्हणून बोलणारी महिला कोण आहे? ती कुठून बोलत होती? तिने पैसे कुठे दिले? या सर्व बाबींचा छडा लागला पाहिजे.”

शिंदे, फडणवीस आणि अमित शहांना निवेदन देणार

“एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक असा बनाव रचला गेला आहे का, हे समोर आलेच पाहिजे. मी आजच स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लेखी पत्र देऊन या 32 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपची सखोल फॉरेन्सिक व सायबर चौकशी करण्याची मागणी करणार आहे. यातून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ जनतेसमोर येईल.” अखेरीस कदम यांनी मनोज जरांगे यांना उद्देशून म्हटले की, “तुमच्याकडे आणखी काही पुरावे असतील तर 2 ते 3 वर्षे वाट न बघता ते लगेच बाहेर काढा. समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतले आहे, त्यामुळे स्वार्थासाठी समाजाचा विश्वासघात करू नका.”

————————————————————-

हेही वाचा…

मनोज जरांगेंकडून गुप्त ऑडिओ क्लिप जाहीर: “जरांगेंना डॅमेज करण्यासाठी मराठ्यांनाच रसद पुरवा, 500 कोटी दिल्याची चर्चा”; शिंदे-फडणवीसांना इशारा

“मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.