Headlines

मराठा समाजात फूट पाडण्याचं मोठं षड्यंत्र!:मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपनंतर अर्जुन खोतकरांचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी




मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपवर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. “मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचे हे एक मोठे षड्यंत्र असून, या ऑडिओ क्लिपची उच्च पातळीवर आणि फॉरेन्सिक लॅबमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी खोतकर यांनी केली आहे. ‘मराठा समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र’ या प्रकरणावर बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, “मला यामध्ये मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचे एक मोठे षड्यंत्र दिसत आहे. या षड्यंत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाणे अत्यंत आवश्यक आहे.” ‘क्लिपची फॉरेन्सिक लॅबमध्ये चौकशी करा’ ऑडिओ क्लिपच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खोतकर यांनी तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाची शक्यता वर्तवली. ते म्हणाले, “या सर्व क्लिप फॉरेन्सिक लॅबने तपासल्या पाहिजेत. ही कॉन्फरन्स मीटिंग आहे की गुगल मीटिंग, यामध्ये कोण-कोण सहभागी होते, हे शोधून काढले पाहिजे. ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून मधेच काही आवाज टाकले आहेत का, हे सर्व तपासून बघितले पाहिजे.” ‘श्रीकांत शिंदेंचे नाव घेणाऱ्या महिलेची चौकशी व्हावी’ ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेणाऱ्या महिलेवर खोतकर यांनी विशेष आक्षेप घेतला आहे. “जी महिला यामध्ये माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचे नाव घेते, त्या महिलेची कसून चौकशी झाली पाहिजे. ती कोणत्या पक्षाशी किंवा कोणाशी निगडित आहे, हे समोर आले पाहिजे. कारण, ती महिला बोलत असताना समोरून कोणीही उत्तर दिलेले नाही, त्यामुळे या क्लिपमध्ये फेरफार केल्याचा संशय येतो,” असे खोतकर यांनी स्पष्ट केले. जरांगेंची ती ऑडिओ क्लिप AI जनरेटेड असावी, SIT चौकशी करा- नवनाथ बन दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण देताना बन म्हणाले, “सध्या बाजारात ‘एआय’चा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, राज कपूर यांचे आवाज काढून लोकांना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांनी दाखवलेली क्लिप ‘एआय’ जनरेटेड किंवा फॅब्रिकेटेड असू शकते. या क्लिपमधील संभाषणाचे संदर्भ हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचे वाटत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालून, गरज पडल्यास स्पेशल एसआयटी (SIT) किंवा टास्क फोर्स नेमून या ऑडिओ क्लिपची सत्यता जनतेसमोर आणावी, अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. स्वतः जरांगे पाटलांनीही चौकशीची मागणी केली आहे.” ————— हेही वाचा.. मनोज जरांगेंकडून गुप्त ऑडिओ क्लिप जाहीर: “जरांगेंना डॅमेज करण्यासाठी मराठ्यांनाच रसद पुरवा, 500 कोटी दिल्याची चर्चा”; शिंदे-फडणवीसांना इशारा

“मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *