Headlines

शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आक्रमक:पालकमंत्र्यांची आश्वासने म्हणजे 'बोलाची कढी अन् बोलाचा भात'; मंत्री झिरवाळांना कॉल करत विचारला जाब




हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी चार दिवसांत बैठक लावण्याचे आश्‍वासन म्हणजे बोलाची कढी अन बोलाचा भात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून करण्यात आला आहे. या संदर्भात कधी बैठक घेणार असा सवाल वसमत तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट पालकमंत्री झिरवाळ यांना विचारला असून या संदर्भातील ऑडीओ क्लिप देखील व्हायरल होत आहे. हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. या महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी आल्या पावली परत पाठविले. त्यामुळे जिल्हयातील सुमारे २० गावांमधून मोजणीच झाली नाही. या महामार्गाला आमचा विरोध असून मोजणी करू नये अशी विनंती शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, ता. १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री झिरवळ हिंगोलीत आले असतांना संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरशः घेरावो घातला. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे पालकमंत्री झिरवळ यांना पोलिस बंदोबस्तात बैठकीतून बाहेर काढावे लागले होते. यावेळी त्यांनी काही शेतकऱ्यांशी संवाद चार दिवसांत स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्यापही बैठक झालीच नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, वसमत तालुक्यातील शेतकरी सीताराम जाधव यांनी नुकताच थेट पालकमंत्री झिरवाळ यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला. आपण चार दिवसांत बैठक बोलावणार होते त्याचे काय झाले असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. दुष्काळी परिस्थितीमुळे एक एकर मध्ये दिड क्विंटल सोयाबीन झाले त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत त्यानंतर आता शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा मोजणीच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी मानसीक तणावाखाली असल्याचे जाधव यांनी सांगितले. महामार्गासाठी मोजणी करू नये अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाला देण्याची विनंतीही जाधव यांनी केली. यावेळी पालकमंत्री झिरवळ यांनी शेतकऱ्यांची अडचण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कानावर घातली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठकी बाबत बोलणे झाले त्यांनी लवकरच वेळ देण्याचे आश्‍वासन दिल्याचे पालकमंत्री झिरवळ यांनी सांगितल्याचे ऑडीओ क्लिप वरून स्पष्ट होत आहे. मात्र आता बैठक कधी होणार याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. पालकमंत्र्यांचे आश्‍वासन म्हणजे बोलाची कढी- गजानन कावरखे (मराठवाडा अध्यक्ष क्रांतीकारी शेतकरी संघटना) शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. पालकमंत्र्यांनी बैठकीचे दिलेले आश्‍वासन म्हणजे बोलाची कढी अन बोलाचा भात असून आता आमचा त्यांच्यावर विश्‍वास राहिलेला नाही. पुढील काळात सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे केले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *