Headlines

अतुल सावे यांचे आवाहन: योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा:महात्मा फुले द्विजन्मशताब्दीनिमित्त यशदामध्ये दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला सुरुवात




शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनातील विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राखून योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणमंत्री आणि वनार्टीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे २४ आणि २५ ऑक्टोबरदरम्यान हे शिबिर होत आहे. सावे म्हणाले, की शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे. प्रशासकीय नियम आणि कार्यपद्धतींचे पालन करताना क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा. या प्रशिक्षणामुळे विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुसूत्रपणे होण्यास मदत होईल. शिबिरात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य, विभागाचे क्षेत्रीय अधिकारी आणि महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले आहेत. विभागाच्या विविध योजना, शासकीय नियम, प्रशासकीय जबाबदाऱ्या, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय स्तरावरील समन्वय याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या समताधिष्ठित विचारांनुसार बहुजन समाजाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना गती देणे, हा शिबिराचा प्रमुख उद्देश आहे. या वेळी भटके-विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, वनार्टीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांच्यासह राजेंद्र दोनाडकर, डॉ. संजय पुरी, नरेश पोटे आणि शरद माकर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *