Headlines

'सत्तेचा उन्माद जास्त काळ टिकत नाही':हर्षवर्धन सपकाळांचा थेट इशारा; पूर्णेकर हत्याकांडावरून सरकारवर गंभीर आरोप




ठाण्यातील हादरवून सोडणाऱ्या पूर्णेकर हत्याकांड प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या निर्घृण हत्येतील खऱ्या सूत्रधारांना पोलिस संरक्षण देत असून, पीडित कुटुंबालाच नाहक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, सत्तेच्या गैरवापरातून विरोधकांना संपवण्याचा डाव रचला जात असल्याची टीका करत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या उन्मादात पोलिसांचा गैरवापर त्वरित थांबवावा, असा थेट इशाराही देण्यात आला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ठाण्यातील पूर्णेकर हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एक समाजसेवक, एक मदत करणारा कार्यकर्ता ज्याच्या कुटुंबाची समाजसेवेची, सांस्कृतिक कार्याची आणि राजकीय पार्श्वभूमी आहे अशा माणसाला दाट वस्तीमध्ये दिवसाढवळ्या ज्या पद्धतीने मारले गेले, ते धक्कादायक आहे. खून करणे हा एक भाग आहे, पण जी पद्धत वापरली, ती कोयत्याने सपासप वार करून मारण्याची होती, ही पद्धत महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे. देवेंद्र फडणवीसांवर टीका “सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात हे उलटे झाले आहे. आता “खलसंरक्षणाय, सजनिग्रहणाय” असे नवीन ब्रीदवाक्य करण्याची वेळ आली आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कारण या हत्याकांडात जे खरोखर दोषी आहेत, ज्यांनी सुपारी देऊन हा खून घडवून आणला, त्यांना पोलिस संरक्षण देत आहेत आणि एका कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी, महाराष्ट्र पोलिस त्यांनाच त्रास देत आहेत. आम्ही या वर्तनाचा धिक्कार करतो. असे सपकाळ यांनी म्हटले. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की सत्तेचा उन्माद जास्त काळ टिकत नाही. पोलिसांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा जो खेळ मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात सुरू आहे, तो ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. सत्तेची ही नशा उतरल्यावर जे परिणाम भोगावे लागतील, त्याचा विचार करा. हा तपास एका आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा या खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे. मृत व्यक्तीच्या कुटुंबाने जे आरोप केले आहेत, ज्या संशयितांची नावे दिली आहेत, त्यांचा योग्य तपास करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुटुंबाने ज्यांची नावे दिली आहेत त्यांना बाजूला ठेवून, फक्त मारेकऱ्यांवर कारवाई करणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे. हा तपास एका आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आता एसआयटीची स्थापना करून जो दिखावा सुरू आहे तो त्वरित थांबवावा. गृहविभागाने एसआयटीची स्थापना केली नाही, तर स्थानिक पोलिसांनी एक अंतर्गत व्यवस्था म्हणून ती तयार केली आहे आणि त्याचे नेतृत्व आयपीएस अधिकारी करत नाहीत. त्यामुळे हा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि महाविकास आघाडी या प्रकरणात पूर्णपणे पूर्णेकर कुटुंबाच्या पाठीशी आहे. एका बाजूला पोलिस, दुसऱ्या बाजूला कायदेशीर अडचणी आणि कुटुंबाची होणारी ससेहोलपट, हे अत्यंत क्लेशदायक आहे. हे सरकार सत्तेचा गैरवापर करून टोळीयुद्ध सुरू करत आहे. हे फक्त अंडरवर्ल्डमध्ये किंवा चित्रपटात होत नाही, तर आता थेट मंत्रालयातून तीन पक्ष टोळीयुद्धासारखे भांडत आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 500 कोटींच्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे मनोज जरांगे आणि 500 कोटीच्या संदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, जरांगे पाटील यांनी काल व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांचा आरोप करण्यात आला आहे. भाजप आणि शिवसेनेत सध्या सत्तेचा मलिदा खाण्यासाठी भांडणे सुरू आहेत, पण सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. पत्राचाळीच्या प्रकरणात संजय राऊत यांच्या नावावर एक लोन होते, या संदर्भाचा आधार घेऊन त्यांना दीड वर्ष तुरुंगात ठेवले गेले आणि ईडीने त्यांच्यावर कारवाई केली. आता ५०० कोटींचा आरोप पुराव्यानिशी समोर आला आहे. ही ऑडिओ क्लिप ४८ तासांनंतरही फेक असल्याचे शासनाने म्हटलेले नाही, उलट ती खरीच असल्याचे सत्ताधारीच सांगत आहेत. त्यामुळे ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर ईडीने खटला दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी. हे ५०० कोटी रुपये कुठून आले, कसे आले आणि त्याची मोजणी कशी झाली, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पूर्णेकर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहू ठाण्यामध्ये जे काही सुरू आहे, ते अत्यंत वाईट आहे. तिथे कुटुंबाला मदत करण्याऐवजी न्याय मागणाऱ्यांनाच दाद दिली जात नाहीये. हा न्याय नाकारण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जर पोलिसांवर दबाव असेल आणि ते कारवाई करू शकत नसतील, तर आम्ही कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्वासन हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *