![]()
महाराष्ट्र राज्य एका बाजूला भीषण दुष्काळात होरपळत असताना आणि शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करत असताना, नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी निर्लज्ज महायुती सरकारकडून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा संतप्त आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मूळ 86.90 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तब्बल 42.15 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून, शासकीय खर्चात 20 टक्के कपात करण्याचे नियम केवळ सामान्य जनतेसाठीच आहेत का, असा सवाल त्यांनी केला आहे. दुसरीकडे, उद्योजक अदानी आणि ‘टोरंट पॉवर’ कंपनीच्या फायद्यासाठी भीमाशंकर व कर्जत परिसरातील तब्बल 600 एकर (233 हेक्टर) घनदाट जंगल उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला जात असल्याचा खळबळजनक आरोप विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सायडोंगर वनक्षेत्रातील 32 हजारांहून अधिक झाडांची कत्तल सुरू असून, यामुळे लाखो मुके पशु-पक्षी, शेकरू यांसारखे वन्यजीव बेघर होत असल्याचा आक्रमक सूर दोन्ही नेत्यांनी लावला आहे. शेतकऱ्यांना 5 हजारांची भीक अन् मंत्र्यांच्या लाडासाठी 42 कोटींची अतिरिक्त उधळपट्टी! हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात करण्यात आलेल्या वाढीवरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या मूळ 86.90 कोटी रुपयांच्या खर्चात थेट 42.15 कोटी रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. एकीकडे दुष्काळग्रस्तांना मदतीच्या नावाखाली 5 हजार रुपयांची तुटपुंजी मदत द्यायची आणि दुसरीकडे मंत्र्यांच्या ऐशआरामावर पाण्यासारखा पैसा उधळायचा, हा थेट महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. कपातीचे नियम फक्त जनतेसाठीच का? शासकीय खर्चात 20 टक्के कपात करण्याचे पोकळ नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत का, असा सवाल करत वडेट्टीवार यांनी, हे अधिवेशन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे की सत्ताधाऱ्यांचे लाड पुरवण्यासाठी, असा घणाघाती प्रश्न विचारला आहे. आधी दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट न्याय द्या, प्रशासकीय कपातीचे नियम स्वतःला लागू करा आणि उधळपट्टी थांबवा, अशी मागणी त्यांनी केली. भीमाशंकरच्या 600 एकर जंगलाचा बळी भीमाशंकर परिसरातील नियोजित जंगलतोडीवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर तोफ डागली आहे. अदानी समूहाच्या प्रकल्पासाठी भीमाशंकर परिसरातील तब्बल ६०० एकर समृद्ध जंगल तोडण्याचा घाट घातला जात असेल, तर हा विकास नसून महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीवर घातलेला मोठा घाला आहे. आदिवासींचा जगण्याचा आधार हिरावणार एकीकडे आदिवासींच्या विकासाच्या पोकळ घोषणा करायच्या आणि दुसरीकडे त्यांची जमीन, संस्कृती व जगण्याचा आधार हिरावून घ्यायचा, हे कोणत्या न्यायात बसते? आदिवासींचे जंगल म्हणजे केवळ झाडे नसून त्यांच्या पिढ्यान्पिढ्यांच्या अस्तित्वाचा तो आधार आहे. उद्योगसमूहांच्या हितासाठी हा आधार उद्ध्वस्त करू देणार नाही. मानव-वन्यजीव संघर्ष पेटण्याची भीती या जंगलतोडीमुळे आधीच गंभीर असलेला मानव आणि वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होईल. वन्यजीवांचा अधिवास नष्ट करून सर्वसामान्य जनतेचा जीव धोक्यात घालणार का, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राची जंगले ही कोणत्याही उद्योगसमूहाला आंदण देण्यासाठी ठेवलेली खासगी मालमत्ता नाही, असा इशारा त्यांनी दिला. कर्जतच्या सायडोंगर वनक्षेत्रात 30 हजारांहून अधिक झाडांची कत्तल; रोहित पवारांचा इशारा याच मुद्यावर आक्रमक होत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील (X) विस्तृत पोस्टमध्ये कर्जत तालुक्यातील विनाशाचे भयानक चित्र मांडले आहे. कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर अभयारण्याला लागून असलेल्या सायडोंगर वनक्षेत्रात पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी 233 हेक्टर क्षेत्रातील तब्बल 32 हजारांहून अधिक घनदाट झाडांची कत्तल सुरू आहे. कागदावर हा आकडा 32 हजार दिसत असला तरी प्रत्यक्षात तो लाखापर्यंत जाईल. यादरम्यान घरट्यातील पिल्ले, अंडी आणि हजारो-लाखो मुक्या पक्षांचा आकांत कुणालाही ऐकू येत नाहीये, हे दुर्दैव आहे. इर्शाळवाडीसारख्या दुर्घटनेची टांगती तलवार या प्रकल्पासाठी डोंगरांमध्ये शक्तिशाली सुरुंगाचे स्फोट केले जाणार आहेत, ज्यामुळे संपूर्ण डोंगराचा भाग कमकुवत होऊन भविष्यात माळीण किंवा इर्शाळवाडीसारख्या भयंकर दरड कोसळण्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मुंबई-पुण्याचं हवामान संतुलित राखणारा हा परिसर नष्ट झाल्यास स्थानिकांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर येईल. 3 नोव्हेंबरच्या उद्घाटनाची घाई कशासाठी? आगामी 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून, तोपर्यंत संपूर्ण जंगल नष्ट करण्याचा विडा या ‘झाडखाऊ’ सरकारने उचलला आहे का, असा संतप्त सवाल रोहित पवारांनी केला आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण चुकीच्या ठिकाणी होणाऱ्या आणि पर्यावरणाचा व आदिवासींचा सत्यानाश करणाऱ्या या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध राहील. याविरोधात जनतेने एकत्र येऊन दाब निर्माण केला नाही, तर उद्याची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला. ———————————————————————— हेही वाचा… सूत्राच्या जिवाची हमी दिली तर शिंदे-फडणवीसांना क्लिप देतो!:मनोज जरांगे म्हणाले- षड्यंत्र उघड केल्याने आता दोन्ही पक्ष माझ्या मागे लागतील “गोरगरीब मराठा समाजाच्या आणि माझ्या राजकीय अस्तित्वाच्या विरोधात पडद्यामागे नेमके किती भयंकर कटकारस्थान शिजत होते, हे मी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उघडकीस आणले आहे. स्वतःचा हा मोठा अपराध झाकण्यासाठी आणि सत्य पचवण्याची हिंमत नसल्याने आता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन माझ्या मागे लागतील, अशी दाट शक्यता आहे. मात्र, या सर्व राजकीय ताकदीला मी एकटाच पुरून उरेन! विशेष म्हणजे, माझी पत्रकार परिषद होण्याच्या 2 तास आधीच केवळ श्रीकांत शिंदेंच्या 500 कोटींच्या उल्लेखाची क्लिप टीव्ही चॅनेलवर रामदास कदमांनी वाजवली; मग एकनाथ शिंदेंची खरी बदनामी मी केली की रामदास कदमांनी?” असा खडा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर
Source link
अदानींसाठी 600 एकर जंगल भस्मसात करण्याचा डाव!:विजय वडेट्टीवारांसह रोहित पवारांचे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले- मंत्र्यांच्या लाडासाठी 42 कोटींची अतिरिक्त उधळपट्टी