मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये थेट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना 500 कोटी रुपये दिल
.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी अत्यंत हसतखेळत आणि उपरोधिक शैलीत या आरोपांचे खंडन केले. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाच्या फॉरेन्सिक तपासाचे आदेश दिले असून सत्य लवकरच समोर येईल, असेही स्पष्ट केले.
500 कोटी रुपये मोजायचे कसे आणि त्यासाठी गाड्या किती लागतील?; मीही रिसर्च करतोय!
ऑडिओ क्लिपमधील 500 कोटींच्या आकड्यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “तो 500 कोटींचा नेमका मालक कोण आहे आणि ज्याच्याकडे ते पैसे पाठवले होते, तो माझ्यापर्यंत किंवा जरांगे पाटलांपर्यंत पोहोचलाच कसा नाही? त्यामुळे जरांगे पाटलांना जो प्रश्न पडलाय, तोच प्रश्न आज मलाही पडला आहे. मी गेल्या दोन दिवसांपासून यावरच रिसर्च करत आहे की, जर 500 कोटी रुपये रोख मोजायचे म्हटले तर ते एकाच ठिकाणी कसे दिसतील आणि ते वाहून नेण्यासाठी नेमक्या किती गाड्या लागल्या असत्या?”
तुम्हीही शोधा, मला सापडल्यास मी सांगेन
“आता या सगळ्या गोष्टी कोण आणि का बोलत आहे, यावर तुम्ही लोकही प्रश्न विचारत आहात. तुम्ही पत्रकार लोकही गेल्या दोन दिवसांपासून यामागचा शोधच घेत आहात ना? मग एक काम करा, तुम्हीही शोधा; तुम्हाला जर तो 500 कोटींचा मालक सापडला तर मला सांगा आणि मला सापडला तर मी तुम्हाला सांगतो!” असा मिश्कील टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत फॉरेन्सिक तपासाचे आदेश
या प्रकरणाच्या सत्यतेबाबत बोलताना त्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. “या संपूर्ण प्रकरणाची सखोल शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फॉरेन्सिक तपासणीचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून आणि यंत्रणांकडून या प्रकरणाचा कायदेशीर अभ्यास केला जात आहे. त्यामुळे या ऑडिओ क्लिपमागील सत्य काय आहे, ती खरी आहे की खोटी, हे लवकरच जनतेसमोर स्पष्ट होईल.”
31 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधील धक्कादायक संभाषण
दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जरांगे यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजप आणि महायुतीच्या अंतर्गत रणनीतीकारांची गंभीर चर्चा उघड झाली आहे.
भाजपचे मराठा चेहरे पुढे करा: क्लिपमधील चर्चेनुसार, “जरांगे भाजपला ‘मराठाद्रोही’ ठरवत आहेत आणि त्याचा प्रभाव समाजात पडत आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले यांचा व्हिडिओ केला, तसाच मुद्दा घेऊन खासदार उदयनराजे भोसले किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना (नरेंद्र पाटील) बोलते केले पाहिजे. प्रवीण दरेकर किंवा नारायण राणे यांच्या बोलण्यापेक्षा या मराठा चेहऱ्यांनी समोर येऊन जरांगेंना उत्तर दिले पाहिजे.”
वैयक्तिक फंड आणि गाड्यांचा खर्च: “पार्टीचा फंड वापरायचा नसेल, तर वैयक्तिक लोकांनी स्वतःचा फंड वापरावा. जरांगेंच्या विरोधात बोलणाऱ्यांना प्रपोजल द्यावे, त्यांच्या गाड्यांचा आणि मोर्चांचा खर्च उचलावा. निरंजन डावखरे आले होते, तेव्हा जरांगेंच्या विरोधातील 2 ते 4 लोकांशी त्यांचे बोलणे करून दिले आहे. एक वेगळा गट प्रवीण दरेकरांशी जोडून दिला आहे.”
500 कोटींचा उल्लेख आणि विधानसभा नफा-तोटा: क्लिपमध्ये एका महिलेचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो, “जरांगे पाटील को ऑलरेडी 500 करोड रुपये श्रीकांत शिंदे के पास से पहुंच चुके हैं… अब जरांगे पाटील विधानसभा चुनाव में हमारे फायदे का रहेगा या नहीं, इसमें मेरा मत अलग है, कॅल्क्युलेशन अलग है… बाकी आप लोग जो सोचते हैं…” यावरून विधानसभा निवडणुकीत जरांगेंच्या भूमिकेचा राजकीय फायदा-तोटा कसा मोजला जात होता, हे समोर आले आहे.
3. मीडिया मॅनेजमेंट, लव्ह जिहाद आणि सोशल मीडिया ट्रेंड्सची रणनीती : या क्लिपमध्ये केवळ जरांगे यांच्या आंदोलनावरच नव्हे, तर राज्यातील विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर नॅरेटिव्ह कसा फिरवायचा, याचीही सविस्तर चर्चा उघड झाली आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स यांसारख्या वर्तमानपत्रांतून लेख लिहून आणणे, चीन-अमेरिका ‘डीप स्टेट’चा संदर्भ देऊन राहुल गांधींवर टीका करणे, आणि सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी कर्नाटक, मध्यप्रदेशातील घटना पुढे करण्याची चर्चा यात झाली.
स्थानिक मुद्द्यांचे ध्रुवीकरण : संभाजीनगरमधील घटना, श्रीरामपूरमधील कथित धर्मांतराचा मुद्दा आणि कर्नाटकातील हनुमान जन्मस्थळावरून धनुष्यबाण हटवल्याचा विषय पुढे करून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडणे, तसेच ‘व्होट जिहाद’ आणि ‘मराठ्यांचे ओबीसीकरण’ या मुद्द्यांवर यात्रा-सभा घेऊन वातावरण ढवळून काढण्याची योजना या संभाषणात मांडण्यात आली.
पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी आंदोलकांना घेरण्याची रचना : पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाच्या वेळी पंतप्रधानांच्या दौऱ्याला होणारा विरोध हा ‘देशविरोधी’ आणि ‘महाराष्ट्रविरोधी’ कसा आहे, हे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर विशिष्ट हॅशटॅग चालवून ट्रेंडिंग करण्याची रणनीतीही या बैठकीत ठरवली गेली.
दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी आजही पत्रकार परिषदेत मला बदनाम करण्यासाठीच हे षडयंत्र रचले गेल्याचा दावा केला आहे. मराठा आंदोलन चिरडण्यासाठी आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा घाट का घातला, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. समाजातील तरुणांना ईडी आणि एसआयटीच्या धमक्या देऊन फोडण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्य बाहेर काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप ‘एआय’ने बनवलेली नसून ती खरी आहे आणि पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनीही याची दखल घेतली असल्याचे सांगत जरांगे यांनी या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, माझा विषय एवढाच आहे की तुम्ही मला 500 कोटी देण्याचा आणि बदनाम करण्याचा घाट का घातला? तुम्ही आंदोलन दाबण्याचा चिरडण्याचा डाव का रचला? माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तुम्ही इतके का द्वेषने पेटून उठलात की मराठा समाजाचं आंदोलन बंड पडलं पाहिजे म्हणून 3 वर्षंपासून तुम्ही मोठ मोठाले संकट माझ्या पुढं उभा करत आहात, याचं कारण काय? माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे.
————————————————————-
हेही वाचा…
‘मला बदनाम करण्यासाठी 500 कोटींचा घाट का घातला?’: मनोज जरांगेंचा संतप्त सवाल; ऑडिओ क्लिप खरीच असल्याचा दावा

मराठा आंदोलन चिरडण्यासाठी आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा घाट का घातला, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. समाजातील तरुणांना ईडी आणि एसआयटीच्या धमक्या देऊन फोडण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्य बाहेर काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप ‘एआय’ने बनवलेली नसून ती खरी आहे आणि पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनीही याची दखल घेतली असल्याचे सांगत जरांगे यांनी या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी