![]()
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील महाल परिसरातील निवासस्थानाबाहेर आंदोलनाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर भाजपच्या काही नेत्यांनी मध्यस्थी करत हे आंदोलन गडकरींच्या घरासमोर होऊ नये यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आज विश्व हिंदू परिषदेच्या नागपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान विहिपच्या पदाधिकाऱ्यांनी प्यारे खान यांच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर तक्रार मांडली. प्यारे खान हे आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नितीन गडकरी यांनी या सर्व तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच, या प्रकरणाची आपल्याला पूर्वकल्पना नसल्याचे सांगत, संबंधित विभागाकडे ही तक्रार पाठवून या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी विहिपच्या शिष्टमंडळाला दिले. सकारात्मक चर्चा विश्व हिंदू परिषदेचे महानगर कार्यवाह अमोल ठाकरे यांनी या भेटीबाबत माहिती देताना सांगितले की, नितीन गडकरी यांच्यासोबतची ही चर्चा अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही या प्रश्नावर आंदोलन करत आहोत, मात्र महिनाभर आधीच गडकरींची भेट घेतली असती तर अधिक बरे झाले असते. नितीन गडकरी हे आमच्यासाठी पितृतुल्य असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. आंदोलनाचे स्थळ बदलले नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या घरासमोर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आजचे पूर्वनियोजित आंदोलन रद्द करण्यात आलेले नसून ते आता गडकरींच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केले जाईल आणि आमचा लढा यापुढेही असाच सुरू राहील, असे अमोल ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Source link
प्यारे खान यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेचा एल्गार:केंद्रीय मंत्री नितीन गडकारींची मध्यस्थी; काय आहे नेमके प्रकरण?