Headlines

सरकारच्या चौकशीवर आमचा तिळमात्र विश्वास नाही!:ऑडिओ क्लिपची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून 45 दिवसांत अहवाल सादर करा, संदीप देशपांडेंचा अल्टिमेटम




“राज्यात सध्या गाजत असलेल्या कथित 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी स्वतः सरकारच करणार असेल, तर त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? कारण या संभाषणात ज्यांची नावे समोर येत आहेत, ते सर्व सत्ताधारी पक्षातील (भाजप आणि शिवसेना) नेते आहेत. गृहखाते आणि सरकार स्वतःच स्वतःची चौकशी करणार असल्याने त्याला कोणतीही ऑथेंटिसिटी उरलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीचा अहवाल 45 दिवसांच्या टाईमफ्रेममध्ये लोकांसमोर आला पाहिजे,” अशी आक्रमक मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मुंबईत आयोजित केलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना संपवण्याचे षडयंत्र, माध्यमांवरील कथित दबाव आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकार स्वतःचीच चौकशी कशी करणार? सरकारने घोषित केलेल्या फॉरेन्सिक तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना देशपांडे म्हणाले, “गेल्या 2 ते 3 वर्षांत समोर आलेल्या अनेक ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओंच्या फॉरेन्सिक चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली होती; मात्र आजतागायत एकाही प्रकरणाचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मग आताच्या क्लिपच्या फॉरेन्सिक तपासावर जनतेने कसा विश्वास ठेवावा?” पहिली पायरीच पार पडलेली नाही “व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप कोणातरी मला फॉरवर्ड केली, तर त्या फॉरवर्डेड क्लिपची थेट फॉरेन्सिक चौकशी होऊ शकत नाही. त्यासाठी आधी मनोज जरांगे पाटील यांना बोलावून त्यांच्याकडील मूळ क्लिपचा पंचनामा करावा लागतो आणि नंतर ती फॉरेन्सिकला पाठवावी लागते. सरकारने अद्याप ही पहिली पायरीही पार पाडलेली नाही. त्यामुळे ही केवळ चार दिवसांची नौटंकी असून प्रकरण विरून जाण्याची वाट पाहिली जात आहे.” 45 दिवसांची डेडलाइन “सत्ताधारी पक्षातील नेतेच यात गुंतले असल्याने गृहखात्याने याची चौकशी करणे निष्पक्ष ठरणार नाही. आमची प्रमुख मागणी आहे की, या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे आणि येत्या 45 दिवसांच्या आत सत्य लोकांसमोर आले पाहिजे.” विरोधी पक्षाला संपवण्याचे कुटील कारस्थान ऑडिओ क्लिपमधील संभाषणाचा रोख विरोधी पक्षांवर आणि माध्यमांवर असल्याचा दावा त्यांनी केला. “या ऑडिओ क्लिपमधील संभाषणावरून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते ती म्हणजे, सत्तेत बसलेले लोक विरोधी पक्षाला कसे संपवायचे, त्यांना विकासाच्या विरोधात कसे प्रोजेक्ट करायचे, याचे नियोजन करत आहेत. निवडणुकीशिवाय आंदोलनांच्या मार्फत किंवा यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांचे उच्चाटन करण्याचा हा कट असून, यावर ‘कॉन्स्पिरसी’चे (किंवा देशद्रोहाचे) कलम लागले पाहिजे.” माध्यमांच्या स्वातंत्र्यावर घाव “या क्लिपमध्ये देशातील अत्यंत प्रसिद्ध अशा वृत्तसमूहांच्या आणि संपादकांच्या नावांचा उल्लेख केला गेला आहे. सत्ताधारी नेत्यांकडून लेख छापण्याबाबत किंवा न छापण्याबाबत माध्यमांवर कसा दबाव टाकला जातो, हे यातून उघड झाले आहे. जर सरकार अशा प्रकारे वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांना आपल्या दावणीला बांधत असेल, तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ पूर्णपणे धोक्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वृत्तसमूहांनीही आपली बाजू स्पष्ट करून जनतेसमोर पारदर्शकता सिद्ध केली पाहिजे.” लोकशाहीला सुरुंग लावणारे एक्सपोज झाले आहेत भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वादावर भाष्य करताना देशपांडे म्हणाले, “सध्या भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) कोण कोणाचे कपडे फाडतोय किंवा रामदास कदम कोणावर आरोप करतायत, यात आम्हालाि कोणताही रस नाही. प्रसारमाध्यमांनी आणि नेत्यांनी या वादावर फोकस न ठेवता मूळ मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मुद्दा हा आहे की, सोशल मीडियावर करोडो रुपये ओतून आणि वृत्तसमूहांना आमिष दाखवून विरोधी पक्षाला संपवण्याचा कट रचला जात आहे का? ५०० कोटी रुपयांचे हे डील खरे आहे का? हे देशवासीयांसमोर आले पाहिजे.” दोन्ही पक्ष एक्सपोज झाले आहेत “या संपूर्ण प्रकारामुळे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष पूर्णपणे एक्सपोज झाले आहेत. म्हणूनच दोघांनाही या प्रकरणाची सखोल चौकशी नको आहे, जेणेकरून आपापल्या पापे झाकता येतील.” पत्रकार परिषदेच्या शेवटी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी दुष्काळ दौऱ्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, पक्षाच्या वतीने दुष्काळग्रस्त भागाचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून त्यानंतर राजसाहेब पुढील भूमिका जाहीर करतील. तसेच मुंबईत २८ तारखेला निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात होणाऱ्या मोर्च्यावर आणि ‘फ्रेंडशिप फाइल’च्या सार्वजनिक स्क्रीनिंगबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. ——————————————————————————— हेही वाचा.. सूत्राच्या जिवाची हमी दिली तर शिंदे-फडणवीसांना क्लिप देतो!: मनोज जरांगे म्हणाले- षड्यंत्र उघड केल्याने आता दोन्ही पक्ष माझ्या मागे लागतील “गोरगरीब मराठा समाजाच्या आणि माझ्या राजकीय अस्तित्वाच्या विरोधात पडद्यामागे नेमके किती भयंकर कटकारस्थान शिजत होते, हे मी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उघडकीस आणले आहे. स्वतःचा हा मोठा अपराध झाकण्यासाठी आणि सत्य पचवण्याची हिंमत नसल्याने आता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन माझ्या मागे लागतील, अशी दाट शक्यता आहे. मात्र, या सर्व राजकीय ताकदीला मी एकटाच पुरून उरेन! विशेष म्हणजे, माझी पत्रकार परिषद होण्याच्या 2 तास आधीच केवळ श्रीकांत शिंदेंच्या 500 कोटींच्या उल्लेखाची क्लिप टीव्ही चॅनेलवर रामदास कदमांनी वाजवली; मग एकनाथ शिंदेंची खरी बदनामी मी केली की रामदास कदमांनी?” असा खडा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *